‘रंगतदार गाण्याची अखेर...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:02 AM2021-03-29T04:02:56+5:302021-03-29T04:02:56+5:30
औरंगाबादकरांना आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यातील रसिकांना अनेक मोठमोठ्या कलाकारांना ऐकण्याची संधी केवळ नाथरावांमुळेच मिळू शकली. त्यांचा आणि माझा परिचय ...
औरंगाबादकरांना आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यातील रसिकांना अनेक मोठमोठ्या कलाकारांना ऐकण्याची संधी केवळ नाथरावांमुळेच मिळू शकली.
त्यांचा आणि माझा परिचय १९७८ सालापासून आहे. कामाच्या निमित्ताने त्यांची नेहमीच भेट व्हायची. माझ्या अनेक संगीत रचनांना नाथरावांचा आवाज लाभला होता. अगदी उत्साहाने ते तेव्हा रेकॉर्डिंगला यायचे. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे बसून सगळे गाणे समजून घ्यायचे आणि त्यांच्यातले सर्वोत्तम देऊन गायचे.
ते गायक तर होतेच; पण उत्तम रचनाकारही होते. अनेक बंदिशींचे काव्य आणि स्वररचना त्यांची स्वत:चीच असायची. ‘मितवा’ हे त्यांचे पुस्तकदेखील प्रसिद्ध झाले होते.
‘रंगतदार’ अशा शब्दांत नाथरावांच्या गाण्याचे वर्णन करता येईल. गाण्याने आणि बोलण्याने श्रोत्यांना खुश कसे करायचे, हे त्यांना चांगले माहीत होते. बोलण्यात अतिशय सहजता आणि गाण्यामध्ये लयकारी होती. उत्तम सरगम करून, रागाची प्रकृती सांभाळून तो अधिकाधिक रंजक करण्याकडे त्यांचा कल असायचा. स्वत:च्या रचना ते गायचेच; पण गुरू अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडून मिळालेले ज्ञानही सादर करायचे.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर घडविले आहे. नुसते घडविलेच नाही, तर त्यांना नोकरीला लावून त्यांच्या पोटापाण्याची सोयही करून दिली आहे. गुरुकुल पद्धतीने ते विद्यार्थ्यांना शिकवायचे. अखेरपर्यंत नाथराव उत्साहमूर्तीच होते. गाण्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला गेले की, अतिशय उत्साहाने ते नक्की येतो, असे आवर्जून सांगायचे आणि यायचेही.
काही मंडळींनी पंच्याहत्तरीनिमित्त २०१९ साली माझा सत्कार केला होता आणि त्यात प्रमुख पाहुणे म्हणून नाथराव आले होते. ही माझी आणि त्यांची शेवटची भेट. त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा मी नाथरावांसोबतच होतो. तेव्हाचे ते सगळे दु:ख त्यांनी गाण्यातून दाबले होते. हा त्यांचा मोठेपणा होता.
नाथरावांचा स्वभाव अत्यंत विनाेदी होता. ते गप्पांच्या मैफलीत आहेत आणि हशा निर्माण झाला नाही, असे कधीच झाले नाही. नाथरावांचे जाणे संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे. त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली.
-पं. विश्वनाथ ओक, संगीतकार