दुष्ट विचारांचा अंत करा - प्रीतम मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:33 AM2017-10-01T00:33:18+5:302017-10-01T00:33:18+5:30
दुष्ट विचारांचा अंत व नव्या विचारांची साठवण करुया असे प्रतिपादन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगावघाट : संपूर्ण वंचित समाज पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहे. दसरा मेळावा हे हक्काचे व्यासपीठ आहे. आम्ही आता भगवानबाबांच्या लेकी झालोत. दुष्ट विचारांचा अंत व नव्या विचारांची साठवण करुया असे प्रतिपादन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.
भगवानगडावरील दसरा मेळावा हा समाज बांधवांसाठी एक उर्जा असते. त्यांच्यासाठी म्हणून पंकजातार्इंनी गडाची लेक म्हणून फक्त वीस मिनिटे बोलण्याची संधी मागितली. परंतु, ती नाकारताना सर्व सीमांचे उल्लंघन केले, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.
आ. भीमराव धोंडे यांनी भाषणात पंकजा मुंडेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आणि त्याला जनसागरातून टाळ्याच्या गजरात प्रतिसाद मिळाला. सावरगावच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविक विजय गोल्हार यांनी केले. यावेळी ह.भ.प.पानेगावकर, प्रा. लहू जायभाये, रशीद इनामदार, अॅड. सतीश पालवे, प्राचार्य डॉ. खुषाल मुंडे, माजी आ. दरेकर, दगडू पाटील बडे, कायंदे, आ. मुरकुटे, सदाशिव खाडे यांची भाषणे झाली. ज्ञानेश्वरी बडे हिने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर गीत सादर केले.
मेळाव्याला आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, राधाताई सानप, भाई ज्ञानोबा मुंडे, गयाताई कराड, सुरेश धस, संतोष हंगे, बुआसाहेब खाडे महराज, सर्जेराव तांदळे, आ. नारायण खोचे, अमित पालवे, गोविंद्र केंद्रे, मेघना बोर्डीकर, प्रा. बिभीषण चाटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
संचालन भागवत कराड, वायबसे यांनी केले. आभार खारे यांनी मानले. मेळाव्यासाठी शेतातील पिके काढून एका दिवसात सावरगाव ग्रामस्थांनी केलेले नियोजन यशस्वी झाले.