औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील लिफ्ट अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:09 PM2018-03-03T19:09:22+5:302018-03-03T19:09:44+5:30
रेल्वेस्टेशनवरील लिफ्ट बंद असल्याने प्रचंड त्रास सहन करून पादचारी पुलावरून ये-जा करण्याची कसरत डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांना करावी लागली.
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील लिफ्ट बंद असल्याने प्रचंड त्रास सहन करून पादचारी पुलावरून ये-जा करण्याची कसरत डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांना करावी लागली. हा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणताच खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्त करून लिफ्ट सुरू केला.
मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून प्लॅटफॉर्म क्रमांक-१ आणि २ वर ज्येष्ठ, दिव्यांग प्रवाशांच्या सुविधेसाठी लिफ्टची सुविधा उभारण्यात आली; परंतु गेल्या काही दिवसांपासून लिफ्ट नादुरुस्त होता. त्याकडे रेल्वे प्रशासनाची डोळेझाक होत होती. रेल्वेकडून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची परीक्षाच घेतली जात होती. याचा २२ फेब्रुवारी रोजी डेक्कन ओडिसी रेल्वेने आलेल्या ज्येष्ठ परदेशी पाहुण्यांनाही फटका बसला. लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ परदेशी पाहुण्यांना इतरांचा आधार घेऊन पादचारी पुलावरून उतरताना चांगलीच कसरत करावी लागली. हा प्रकार ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या वृत्ताची दखल घेऊन लिफ्टची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ, दिव्यांग प्रवाशांना दिलासा मिळाला.