गतविजेत्या पंजाबचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:40 PM2019-02-25T23:40:35+5:302019-02-25T23:41:13+5:30
साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अॅस्ट्रोटर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाने गतविजेत्या पंजाब संघाचे आव्हान संपुष्टात आणत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. हरियाणाप्रमाणेच ओडिशा, मध्यप्रदेश संघांनी उपांत्य फेरी गाठली.
औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अॅस्ट्रोटर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाने गतविजेत्या पंजाब संघाचे आव्हान संपुष्टात आणत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. हरियाणाप्रमाणेच ओडिशा, मध्यप्रदेश संघांनी उपांत्य फेरी गाठली.
सोमवारी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मध्यप्रदेशने चंदीगडचा ३-२ असा पराभव करीत पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केला. हाशीमने चौथ्याच मिनिटाला गोल करीत चंदीगडला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत चंदीगड १-0 गोलने आघाडीवर होता. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. मध्यांतरानंतर ३३ व्या मिनिटालाच आदर्श हर्दुआ याने गोल करीत मध्यप्रदेशला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ४१ व्या मिनिटाला हरप्रीतसिंगने गोल करताना चंदीगडची आघाडी २-१ अशी वाढवली; परंतु त्यानंतर सौरभ पाशीन याने ५१ व्या व ५९ व्या मिनिटाला हैदर अली याने गोल करीत मध्यप्रदेशच्या रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे मध्यप्रदेशने २0१३ नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.
ओडिशा हॉकी आणि गंगपूर ओडिशा यांच्यातील सामनाही चुरसपूर्ण झाला. हा सामना हॉकी ओडिशाने ३-२ असा जिंकला. मध्यंतरात दोन्ही संघ २-२ गोलने बरोबरीत होते. हॉकी ओडिशाकडून अजय एक्काने ९ व्या, प्रदीप लाकरा याने २0 व २८ व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. गंगपूर ओडिशाकडून सुदीप चिमाकीने २५, पुरण केरकेट्टाने ४0 व्या मिनिटाला गोल केला. आज झालेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेता पंजाब आणि उपविजेत्या हरियाणा यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात हरियाणा संघाने पंजाबवर २-0 असा सनसनाटी विजय मिळवताना सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला. सनी मलिक याने आठव्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत हरियाणा संघाला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी हरियाणाने कायम ठेवली. उत्तरार्धात ५३ व्या मिनिटाला रिमांशू याने गोल करीत हरियाणा संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. आजच्या अखेरच्या समान्यात उत्तर प्रदेशने साई संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. आता मध्यप्रदेश वि. हॉकी ओडिशा यांच्यात पहिला आणि हॉकी हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.