‘अभियांत्रिकीे’चे होम सेंटर रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:29 AM2017-11-14T00:29:29+5:302017-11-14T00:29:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी दिले जाणारे होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी दिले जाणारे होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी परीक्षा विभागाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. मागील दोन सत्रांपासून ‘लोकमत’ने होम सेंटरमध्ये होत असलेल्या गैरप्रकारावर प्रकाश टाकला होता. यावर आता परीक्षा विभागाने शिक्कामोर्तब केले.
विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना १५ नोव्हेंबर आणि लेखी परीक्षांना २८ नोव्हेंबरपासून सुुरुवात होणार आहे. या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले. मागील सत्रात १६ मे रोजी मध्यरात्री साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे सील तोडून मध्यरात्री शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात लिहिताना २७ विद्यार्थ्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणामुळे विद्यापीठाची बदनामी देशभर झाली. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने साई अभियांत्रिकीची संलग्नता रद्द केली आहे. या घडलेल्या प्रकारापासून धडा घेत यावेळी अभियांत्रिकीच्या सत्र परीक्षांना होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना विश्वासात घेत नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. नेटके म्हणाले. होम सेंटर रद्द करताना बीड, परळी, तुळजापूर, अंबाजोगाई आणि उस्मानाबाद येथील परीक्षा केंद्रांचा नव्याने विचार करावा लागत आहे. या ठिकाणी केवळ एकच अभियांत्रिकी महाविद्यालय असल्यामुळे होम सेंटर रद्द करताना नवीन पर्यायांचा विचार सुरू आहे. या ठिकाणचे होम सेंटर रद्द केल्यास या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुसºया गावी जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे अधिक पर्याय शोधण्यात येत आहेत. यासाठी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची आणखी एक बैठक बोलावण्यात आली.