अभियांत्रिकीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल; परळीच्या महाविद्यालयातून फोडल्याचा संशय
By राम शिनगारे | Published: May 28, 2024 06:52 PM2024-05-28T18:52:22+5:302024-05-28T18:54:05+5:30
विद्यापीठाने महाविद्यालयाकडून मागवला अहवाल
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. सिव्हिल अभियांत्रिकीच्या टाऊन प्लॅनिंग विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होताच साेशल मीडियात सोमवारी सकाळी व्हायरल झाली. ही प्रश्नपत्रिका परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातून व्हायरल झाल्याचा दावा केला जात असून, परीक्षा विभागाने महाविद्यालयाकडून याप्रकरणी अहवाल मागविला असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील आयसीम, एव्हरेस्ट आणि परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अंबाजोगाईतील टी.बी. गिरवलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात होताच सिव्हिल अभियांत्रिकीचा टाऊन प्लॅनिंग हा तृतीय वर्षाच्या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली. या पेपरची १०७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सोशल मीडियात व्हायरल प्रश्नपत्रिकेवर १०.११ वाजेची वेळ नोंदवली आहे. ही प्रश्नपत्रिका परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात सुरू असलेल्या केंद्रातून फुटली असल्याचा दावा सूत्रांनी केला. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि बैठ्या पथक प्रमुखांकडून तात्काळ अहवाल मागविण्यात आल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली, तसेच पेपर फुटल्याची कोणीही लेखी तक्रार केली नसून, पेपर सुरू होण्यापूर्वीही कुठल्याही केंद्रावरून पेपर फुटला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
...त्यामुळेच झाली होती कारवाई
वैद्यनाथ महाविद्यालयात नागनाथआअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. हालगे महाविद्यालयात मागील परीक्षेवेळी थेट मोबाइल समोर ठेवूनच विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहीत होते. हा प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच केंद्रातून प्रश्नपत्रिकाही फोडण्यात आली. त्यामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ते केंद्र बदलून वैद्यनाथ महाविद्यालयात दिले होते. काही दिवसांपूर्वीच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हालगे महाविद्यालयावर परीक्षेसाठी तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
प्रसारमाध्यमांकडूनच कळले
संबंधित व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका ही बाकड्यांवर ठेवून काढलेली आहे. आमच्या कॉलेजमधून परीक्षा सुरू होण्यापूर्वी कोणतीही प्रश्नपत्रिका व्हायरल झालेली नाही. त्यामुळे हा प्रकार कोणी तरी खोडसाळपणे केलेला असावा. मात्र, आमच्या महाविद्यालयात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
- डॉ. समीर रेणुकादास, केंद्रप्रमुख, वैद्यनाथ महाविद्यालय, परळी