अभियांत्रिकीचे निकाल रखडले, विद्यार्थ्यांचे होणार नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:02 AM2018-08-18T00:02:27+5:302018-08-18T00:05:15+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्नही रखडलेल्या निकालामुळे भंगले आहे. प्रथम वर्षाचे निकाल जाहीर झाले असून, उर्वरित द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाचे निकाल आणखी आठ दिवस लागणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्व अभ्यासक्रमांतील द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाचे निकाल रखडले आहेत. आयआयटी, आयआयएमसह इतर देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी हुकली आहे.
गेट परीक्षेंतर्गत झालेल्या प्रवेशाला २४ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका सादर करणे बंधनकारक आहे. अभियांत्रिकीच्या १२ प्रकारच्या अभ्यासक्रमातील ३५ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. अभियांत्रिकीच्या परीक्षा मे-जून महिन्यात घेण्यात आल्या होत्या.
काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे महिन्यातच पूर्ण झाल्या. तरीही त्याचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. ७ जून रोजी अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर होता.
१५ दिवसांपूर्वीच परीक्षा विभागाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वच निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले होते; मात्र यास दोन आठवडे उलटले तरीही निकाल जाहीर झालेले नाहीत. यास आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.
२४ सप्टेंबरपर्यंत गुणपत्रिकेची मुदत
अभियांत्रिकीच्या एम.टेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ‘गेट’ परीक्षेमार्फत राबविण्यात येते. एम.टेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या आतापर्यंत तीन फेºया जाहीर झाल्या आहेत. यात निकाल जाहीर न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २४ सप्टेंबरपर्यंत गुणपत्रिका सादर करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा प्रवेश रद्द होणार आहेत.
परीक्षा संपून ७० दिवस झाले
विद्यापीठाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावणे बंधनकारक आहे; मात्र अभियांत्रिकीच्या परीक्षा संपल्या त्यास १७ आॅगस्ट रोजी तब्बल ७० दिवस पूर्ण झाले आहेत. १५ मे ते ७ जूनदरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यातील प्रथम वर्षाचा अपवाद वगळता इतर परीक्षांचे निकाल अद्यापही लागलेले नाहीत.
पुणे, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणच्या विद्यापीठांचे निकाल जाहीर झालेले आहेत, यामुळे औरंगाबाद विद्यापीठांतर्गत महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे अभियांत्रिकीच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले.
.....
उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी महाविद्यालया-तील प्राध्यापकच येत नाहीत. यामुळे निकाल रखडले आहेत. प्राध्यापक आल्याशिवाय उत्तरपत्रिकांची तपासणी होणार नाही. त्याशिवाय निकाल लावणेही विद्यापीठाला शक्य नाही.
- डॉ. साधना पांडे, प्रभारी परीक्षा संचालक