अभ्यासाच्या तणावातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:50 IST2019-12-19T19:49:02+5:302019-12-19T19:50:54+5:30
दोन वेळा प्रयत्न केल्यानंतरही तो परीक्षेत उत्तीर्ण झाला नव्हता.

अभ्यासाच्या तणावातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
औरंगाबाद : जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विशालनगर येथे बुधवारी रात्री घडली. अभ्यासाच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
अक्षय सोमनाथ माने (२२, मूळ रा. ताडासोन्ना, जि. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, अक्षय माने हा जेएनईसीचा सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील ६ पेपरमध्ये तो नापास झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो पुणे येथे राहत होता. परीक्षेच्या तयारीसाठी अक्षय नुकताच विशालनगरात भावाकडे आला होता. त्याचा भाऊ औषधी दुकान चालवितो. बुधवारी सकाळी त्याचा भाऊ दुकानावर गेल्यानंतर अक्षय घरीच होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास भाऊ घरी आला तेव्हा त्याला खोलीचे दार आतून बंद दिसले. आवाज देऊनही अक्षयने दार न उघडल्याने शेवटी पुंडलिकनगर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी दार तोडून आत जाऊन पाहिले असता अक्षयने शालीने गळफास घेतल्याचे दिसले.
दोन वेळा प्रयत्न केल्यानंतरही तो परीक्षेत उत्तीर्ण झाला नव्हता. आता पुन्हा परीक्षेची तयारी करीत असताना तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पांढरे हे तपास करीत आहेत.