न्यू हनुमाननगरात अभियंत्याचे घर फोडून ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 07:29 PM2019-12-05T19:29:43+5:302019-12-05T19:31:52+5:30
पावणेपाच तोळ्यांच्या दागिन्यांसह ५० हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली
औरंगाबाद : सिडको एन-४ परिसरालगतच्या न्यू हनुमाननगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी पावणेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये पळविल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल करण्यात आली.
महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता सुरेश दगडूजी माने हे न्यू हनुमाननगर येथे सहकुटुंब राहतात. माने हे सोयगाव येथे कार्यरत आहेत. त्यांची पत्नी माहेरी गेल्याने ३ डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून सोयगाव येथे गेले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे ४ ग्रॅमचे मनीमंगळसूत्र, ५ ग्रॅमचे मनी आणि पेडल, पाच ग्रॅमची ठुशी, ७ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, ३ ग्रॅमचे गळ्यातील लटकन, ५ ग्रॅमची सोनसाखळी, १ ग्रॅमची नथ, सुमारे १७ ग्रॅमचे सोन्याचे चेन, दोन कडे, वाळे, तीन नाणी आणि रोख ५० हजार रुपये चोरून नेले. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता माने यांची पत्नी माहेराहून परतली तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले.
या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पतीला कळविली. रात्री माने हे घरी परतले आणि त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती कळविली. माने यांनी घरात जाऊन पाहिले असता हॉलमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दगिन्यांसह आणि ५० हजाराची रोकड पळविल्याचे त्यांना आढळून आले. पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, डी.बी. पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात ५ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे तपास करीत आहेत.