संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा लौकिक वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:04 AM2021-01-15T04:04:42+5:302021-01-15T04:04:42+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे ज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून जगात या ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे ज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून जगात या विद्यापीठाचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने आयोजित २७ व्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त ‘शैक्षणिक क्षेत्रातील मागासवर्गीयांची गुणवत्तावाढ आणि आर्थिक सक्षमीकरण’, या विषयावर डॉ. प्रशांत नारनवरे यांचे विशेष व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले होते. डॉ. नारनवरे म्हणाले, ‘पूर्वी ज्ञान घेणे किंवा ते संपादन करणे हा गुन्हा होता. आता सर्वांना शिक्षण घेणे हा अधिकार संविधानाने दिला आहे. माणूस शिक्षित झाल्यावर सुसंस्कृत होतो. शिक्षित लोकांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करण्याची गरज आहे. विद्यापीठाने नवोपक्रमाची कास धरली पाहिजे. सॉफ्ट स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर अधिक काम केले पाहिजे. समांतर संस्था निर्माण केल्या तरच आर्थिक सक्षमीकरणांकडे आपली वाटचाल होईल. सत्तर वर्षात वंचित घटकांतील अनेक जणांनी आपल्या कार्यकर्तृवाचा झेंडा सातासमुद्रापार नेला, ही आनंदाची बाब आहे.’
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘मोठ्या संघर्षानंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. नामांतर ही लढाई एका अर्थाने समतेचा संगर आहे. नामांतराच्या लढाईत अनेकांनी बलिदान दिले, याची जाणीव सर्वांनी ठेवावी. आज गुणात्मकदृष्ट्या आपण कोठे आहोत. आपणांस विद्यापीठाने काय दिले, यापेक्षा आपण विद्यापीठाला काय दिले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.’
प्रारंभी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उत्तम अंभोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद तसेच अधिसभा सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.