‘त्या’ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Published: July 6, 2017 11:16 PM2017-07-06T23:16:08+5:302017-07-06T23:21:28+5:30
सेनगाव : तालुक्यातील हत्ता नाईक येथील उंच टेकड्यावरून गावाच्या दिशेने नालीद्वारे काढण्यात आलेल्या पाण्याला वळण देण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील हत्ता नाईक येथील उंच टेकड्यावरून गावाच्या दिशेने नालीद्वारे काढण्यात आलेल्या पाण्याला वळण देण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या प्रकरणात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलणाऱ्या चार शेतकऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले आहेत.
हत्ता नाईक येथे उंच टेकड्यावर शेती असलेल्या काही शेतकऱ्यांनी जेसीबी मशिनद्वारे शेतशिवारात जमा होणाऱ्या पाण्याचा प्रवाह बदलून पाणी बाहेर काढण्यासाठी गावाच्या दिशेने नाली केली. या नालीमुळे सदरील शेत शिवारातील पाण्याचा प्रवाह गावाच्या दिशेने येत आहे. यामुळे गावातील जवळपास ३०० घरांना या पाण्याचा धोका होवू शकतो.
याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने उद्भवणाऱ्या धोक्याच्या अनुषंगाने पाहणी झाली. पाण्याला पुन्हा वळण देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या प्रकरणात सुभाष लक्ष्मण गडदे, लक्ष्मण धोंडबाराव गडदे यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यात तहसीलदार पाटील यांनी सुनावणी घेतली. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलणाऱ्या रंगराव थिटे, भाऊराव थिटे, बाजीराव गडदे, दिलीप राठोड यांनी पूर्वीप्रमाणे पाण्याचा प्रवाह काढून देण्यास आदेशित केले. ही कार्यवाही तातडीने पूर्ण न केल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई करावी, असेही त्यात म्हटले आहे.