चार फेऱ्यांमध्ये प्रवेश

By Admin | Published: June 26, 2014 12:01 AM2014-06-26T00:01:24+5:302014-06-26T00:39:34+5:30

जालना : यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत.

Entering into four rounds | चार फेऱ्यांमध्ये प्रवेश

चार फेऱ्यांमध्ये प्रवेश

googlenewsNext

जालना : यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत. ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. यंदादेखील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन असेल. तंत्रशिक्षण संचालनालयाने स्थापित केलेल्या निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन अ‍ॅन्ड रिसिप्ट सेंटर) विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात. येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआरसीचे केंद्र असून, त्याच ठिकाणी आपला अर्ज दाखल करतानाच विद्यार्थी आपली प्रमाणपत्रे पडताळून घेण्याची संधी उपलब्ध आहे.
१०० पसंतीक्रम
अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा चार प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात प्रत्येकी १०० पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. अखेरच्या फेरीत मात्र ‘कौन्सिलिंग’द्वारे प्रक्रिया राबविली जाईल.
आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्राथमिक यादी ५ जुलै तर अंतिम यादी ९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल.
आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा
अर्ज भरायला एआरसीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सगळी मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स असणे आवश्यक आहे. दरम्यान आरक्षित प्रवर्गातील जे विद्यार्थी अर्ज पडताळणीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही त्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतात. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी तशा आशयाचे हमीपत्र सादर करावे लागेल, असे निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे.
पॉलिटेक्निकची प्रक्रिया २७ जूनपासून
विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळालेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २७ जून पासून ते ६ जुलैपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना हे अर्ज आॅनलाईन भरायचे असून एआरसी केंद्रांवर जाऊन ‘कन्फर्म’ करायचे आहेत. पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेत चार प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीत मात्र समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबविली जाईल. दुसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. याबद्दलची आणखी माहिती विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
गेल्या काही वर्षापासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साह दिसून येत आहे. औरंगाबाद विभागातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. २०१२ साली हजारो अधिक जागा रिक्त होत्या तर मागील वर्षीही या महाविद्यालयांतील हजारो जागा रिक्त राहिल्या आहेत. या वर्षी ते संकट अपेक्षित आहे. हे विशेष. (प्रतिनिधी)
वेळापत्रक
आॅनलाईन अर्ज दाखल करणे २७ जून ते ६ जुलै
कागदपत्रांची पडताळणी २७ जून ते ६ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी ७ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी १२ जुलै
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे १४ जुलै ते १७ जुलै
तात्पुरती प्रवेशयादी १९ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे २६ जुलै ते २८ जुलै
तात्पुरती प्रवेशयादी ३० जुलै
तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमाचा अर्ज भरणे ५ आॅगस्ट ते ७ आॅगस्ट
तात्पुरती प्रवेशयादी ९ आॅगस्ट
समुपदेशन प्रवेश फेरी २० आॅगस्ट
आवश्यक कागदपत्रे
बारावीची गुणपत्रिका
शाळा सोडल्याचा दाखला
जात प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
प्रवेश जालन्यात;क्लास औरंगाबादला
जालना : इयत्ता दहावीचा निकाल १७ जून रोजी जाहीर झाला. या जिल्ह्याचा ८८.५४ टक्के एवढा निकाल लागला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली.
विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत यश पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय ठरली. ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांची संख्या वाखाणण्याजोगी आहे. तर ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्यांची संख्याही लक्षवेधी आहे.
या पार्श्वभूमीवरच यावर्षी विशेष प्राविण्यासह प्रथमश्रेणीत गुण पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वसाधारणपणे इयत्ता अकरावीतील विज्ञान शाखेकडेच कल राहणार हे निश्चित आहे. परंतु हे गुणवंत त्या-त्या महाविद्यालयांमधून निव्वळ प्रवेशापुरतेच अस्तित्व दाखवतील, अशी चिन्हे आहेत. कारण, बहुतांशी गुणवंतांनी औरंगाबाद किंवा पुणे या महानगरांमधून कोचिंग क्लासेसला प्रवेश घेण्याचा संकल्प सोडला आहे. परिणामी शहरासह जिल्ह्यातील नामवंत महाविद्यालयांमधून बहुतांशी गुणवंतांचे प्रवेश हे नाममात्रच असतील, अशी चिन्हे आहेत. औरंगाबाद व पुणे महानगरातील काही नामवंत कोचिंग क्लासेस चालकांनी नेहमीप्रमाणे या जिल्ह्यात गुणवंतांना स्वत:कडे ओढून घेण्याची स्पर्धा चालविली आहे. आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवून हे कोचिंग क्लासेस चालक गुणवंतांचे प्रवेश घडवून आणत आहेत.
या जिल्ह्यातील बहुतांशी गुणवंतांनी औरंगाबाद येथील क्लासेसला प्राधान्य दिले आहे. पाठोपाठ काहींनी सोयी-सवलती पाहून पुण्याला पसंती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर यावर्षी या जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी गुणवंतांचा प्रवेश निव्वळ नाममात्र राहू नये म्हणून, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. शहरातील काही नामवंत महाविद्यालयात नियमितपणे तासिका तसेच विशेष पॅटर्न राबविले जाणार असून, त्यामुळे पालकांसह विद्यार्थी या महाविद्यालयांकडे यावर्षी वळतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यात मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयांनी उदासीनता दाखविली आहे.
अकरावी प्रवेश;
साडेसतरा हजार जागा
जालना : शहरासह जिल्ह्यातील विविध कला, वाणिज्य व विज्ञान अशा एकूण १६७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून इयत्ता अकरावीच्या २०५ तुकड्या असून, १७ हजार ४३३ जागा उपलब्ध असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी बी.के. पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
जिल्ह्यात विविध कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखांत एकूण १९३ तुकड्या आहेत. त्यात १० हजार ४८ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता उपलब्ध आहे तर विज्ञान शाखेच्या ८९ तुकड्या असून, ५ हजार ८३५ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. वाणिज्य शाखेच्या एकूण २३ तुकड्या असून त्यातून १ हजार ५१८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. एकूण जिल्ह्यात २०५ तुकड्यांमधून १७ हजार ४३३ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. गेल्यावर्षी इयत्ता अकरावीतील प्रवेशप्रक्रियेचे हे चित्र होते. यावर्षी याच पद्धतीने इयत्ता अकरावीत विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या असेल, अशी आशा शिक्षण विभागाने व्यक्त केली. गेल्या वर्षी या जिल्ह्यात माध्यमिक शाळांना संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमधूनच विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा लोंढा कायम होता. यावर्षीही तेच चित्र दिसेल, असा अंदाज आहे. नामवंत माध्यमिक संस्थांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातूनच विद्यार्थी दहावी पाठोपाठ अकरावीचाही प्रवेश कायम राखतील, असे चिन्ह असल्यामुळे काही महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Entering into four rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.