जिल्ह्यात सर्वदूर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:36 PM2018-07-06T23:36:03+5:302018-07-06T23:36:24+5:30

गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस.....

The entire Satkundara in the district | जिल्ह्यात सर्वदूर संततधार

जिल्ह्यात सर्वदूर संततधार

googlenewsNext
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : प्रशासनाने दिला तालुक्यांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला.
जूनच्या दुसऱ्या व शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसह पावसाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण सुखावले असले तरी संततधार पावसामुळे जनजीवन बऱ्यापैकी विस्कळीत झाले होते. सदर दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शेतकरी सांगतात. तर जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या तसेच मध्यम जलाशयामधील पाणी पातळीवर बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मोठ्या व मध्यम जलायशात मोडल्या जाणाऱ्या मदन उन्नई धरणाची पाणी पातळी अतिशय कमी झाली होती. शिवाय छोट्या जलाशयात मोडल्या जाणाऱ्या वर्धा शहरानजीकच्या रोठा १ व रोठा २ तसेच टाकळी बोरखेडी या जलाशायाची पाणी पातळी ‘बिलो’ होती; पण गुरूवारी रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे याही जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.
पोलीस प्रशासनही दक्ष
गुरूवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुठले-कुठले रस्ते बंद झालेत. शिवाय कुठे अनुचित प्रकार तर घडला नाही ना याची विचारणा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांकडून जिल्हा पोलीस यंत्रणा शुक्रवारी वेळोवेळी करीत होते. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती ओढावल्यास तात्काळ मदत कार्य करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले.
नागपूरकरांच्या मदतीसाठी वर्धेची रबर मोटर बोट
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने सदर तालुक्यातील किरमिटी गाव परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या गावातील नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी त्यांच्याकडे असलेली एक रबर मोटर बोट पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी २.५५ वाजेपर्यंत बोट झटपट कशी पाठविता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू होते.
२०२.९३ मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात गत २४ तासात एकूण २०२.९३ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात २६.१० मिमी, सेलू तालुक्यात ४४.०० मिमी, देवळी १६.०० मिमी, हिंगणघाट ३०.३२ मिमी, समुद्रपूर ३६.१८ मिमी, आर्वी ३०.५७ मिमी, आष्टी ७.१३ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १२.७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याची सरासरी २५.३७ इतकी असल्याचे सांगण्यात आले.
सीमावर्ती भागात ‘अलर्ट’
नागपूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे १६० मिमी पाऊस झाल्याचे सांगितले जात असल्याने वर्धा-नागपूर या सीमावर्ती भागातील नदी व मोठ्या नाल्या काढच्या गावांना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाला कुठल्याही पूर परिस्थिशी दोन-दोन हात करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.
वायगाव (गोंड)-लाहोरीची वाहतूक ठप्प
समुद्रपूर : सततच्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी वाघाडी नदी दुथडी भरून वाहत होती. वाघाडी नदीच्या पूरामुळे वायगाव (गोंड) - लाहोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय परिसरातील काही शेत जमिनींना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. तालुक्यातील कांढळी तसेच गिरड परिसरातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने या परिसरातील काही भागात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
नंदोरी-हिंगणघाट मार्ग पुरामुळे बंद
नंदोरी : गुरूवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने परिसरातील नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून आले. नंदोरी-हिंगणघाट मार्गावरील सावली गावाजवळील नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती.

Web Title: The entire Satkundara in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस