न्यायालयाच्या प्रवेशद्वारात तरुणावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 12:11 AM2017-01-20T00:11:28+5:302017-01-20T00:12:36+5:30
बीड : जुन्या भांडणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तारखेसाठी न्यायालयात उपस्थित राहून बाहेर पडताना रमेश राठोड या तरुणावर १५ जणांनी प्राणघातक हल्ला चढविला.
बीड : जुन्या भांडणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तारखेसाठी न्यायालयात उपस्थित राहून बाहेर पडताना रमेश दलू राठोड (रा. अंथरवणपिंप्री ता. बीड, हमु. एनके कॉलनी, बीड) या तरुणावर १५ जणांनी प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली. या हल्ल्यावेळी लाठ्या- काठ्या, दगड व धारदार शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला. हल्लेखोर पसार झाले असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, रमेश राठोड हे ठेकेदार असून तीन वर्षांपूर्वी पेठ बीड भागात त्यांचा प्रशांत जाधव व इतरांशी वाद झाला होता. त्याचे पर्यवसान दोन गटातील तुंबळ हाणामारीत झाले होते. तेव्हा पेठ बीड पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण आता जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी न्यायालयात या प्रकरणाची तारीख होती. त्यासाठी रमेश राठोड हे न्यायालयात आले होते. तेथील काम आटोपून ते दुपारी तीन वाजता न्यायालयाच्या बाहेर येत होते. ते प्रवेशद्वाराजवळ येताच कारमधून व दुचाकीवरुन आलेल्या १३ ते १५ जणांनी त्यांच्यावर दगडांचा बेछूट वर्षाव सुरु केला. त्यानंतर त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. ते जायबंदी होऊन जागीच कोसळले. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. यात ते रक्तबंबाळ झाले. दरम्यान, न्यायालय चौकीतील दोन कर्मचारी तेथे येईपर्यंत हल्लेखोर आपल्या वाहनांसह तेथून अहमदनगर रोडमार्गे पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश राठोड यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. या घटनेनंतर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर मोठा जमाव जमला. शिवाजीनगर पोलिसांनी ही गर्दी पांगवली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत जाधव, अमोल जाधव, परशुराम गायकवाड नीलेश जाधव आदींची नावे समोर आली असून इतरांच्या बाबतीतही माहिती घेणे सुरु आहे. हल्लेखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)