जंगल सफारी पार्कचे प्रवेशद्वार किल्ल्यासारखे असणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:04 AM2021-01-18T04:04:51+5:302021-01-18T04:04:51+5:30

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्राप्त जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांचा निधी मिटमिटा येथील जंगल सफारी पार्कसाठी वापरण्यात येणार आहे. ...

The entrance to the jungle safari park will be like a fort | जंगल सफारी पार्कचे प्रवेशद्वार किल्ल्यासारखे असणार

जंगल सफारी पार्कचे प्रवेशद्वार किल्ल्यासारखे असणार

googlenewsNext

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्राप्त जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांचा निधी मिटमिटा येथील जंगल सफारी पार्कसाठी वापरण्यात येणार आहे. जवळपास दीडशे एकरहून अधिक जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्यासारखे असावे, अशी संकल्पना प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मांडली. पार्कच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होत आहे.

मिटमिटा येथील गट क्रमांक-३०७ मधील माळरानावर जंगल सफारी पार्कचा प्रकल्प राबविला जाणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने सफारी पार्कसाठी १४७ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ११ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. सध्या प्राप्त निविदांचे तांत्रिक मूल्यांकन सुरू आहे. लवकरच निविदा अंतिम करून पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंत बांधणे, जमिनीचे सपाटीकरण या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात जंगल सफारी पार्कच्या विविध कामांचा समावेश करून त्याचेही नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी जंगल सफारी पार्कला इतिहासकालीन किल्ल्याचा लूक देण्याचा विचार सुरु केला आहे. या दृष्टीने पीएमसी म्हणून नियुक्त केलेल्या दिल्ली येथील बी. आर. शर्मा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. प्रवेशद्वार हे किल्ल्यासारखे दगडी बांधकामात करण्यात यावे, त्यासोबतच आतील प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी पर्यटकांकरिता बुरूज बांधण्यात यावे. त्यामुळे पर्यटकांची आणि प्राण्यांची नजरानजर होणार नाही. बुरुजामधून प्राण्यांचे जवळून निरीक्षक करता येईल, अशी सूचना केली आहे. पीएमसीचे शर्मा यांनी मनपा प्रशासकांच्या सूचनेला तत्त्वत: मान्यता दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात या कामांचा समावेश केला जाणार असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.

Web Title: The entrance to the jungle safari park will be like a fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.