उद्योजक मनीष धूत यांची कोटींची फसवणूक, दिल्लीच्या इरिषा अग्रीटेकच्या संचालकांवर गुन्हा दाखल
By सुमित डोळे | Published: July 11, 2024 07:40 PM2024-07-11T19:40:11+5:302024-07-11T19:40:31+5:30
आधी मराठवाड्यासाठी डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी विनंती, नंतर त्यांच्या नावाचा वापर करून परस्पर डीलर नेमून उकळले पैसे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी विनंती करून दिल्लीच्या इरिषा ॲग्रीटेक प्रा. लि. च्या संचालकांनी उद्योजक मनीष धूत यांची १ कोटी ५ लाखांची फसवणूक केली. शिवाय, त्यांच्या नावाचा गैरवापर करून मराठवाड्यात परस्पर डीलर नेमून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. बुधवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी इरिषा अॅग्रीटेक कंपनीचे दर्शनसिंग राणा, त्यांचा मुलगा सुधीर राणा, समूह अध्यक्ष परमिंदर सिंग बवेजा, मनीष कुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डिसेंबर, २०२१ मध्ये किरण इंदुलकर, उमेश मुलमुले नामक व्यक्तीने भेट घेतली. इरिषा कंपनीची ओळख सांगून रशियाच्या बेलारूस कंपनीचे शेती उपयोगी अवजारे कंपनी उत्पादित करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील उद्योग जगतात दबदबा असल्याने तुम्ही कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप घेण्याची गळ त्यांनी घातली. सुरुवातीला धूत यांनी नकार दिला. मात्र, विविध आश्वासने देत त्यांनी धूत यांना विनंती केली. त्यानंतर धूत यांनी दिल्लीला जाऊन कंपनीची पाहणी केली. आरोपी मालक राणाची भेट घेतली. जानेवारी, २०२२ मध्ये राणाने शहरात येत धूत यांना लेटर ऑफ इन्टेन्ड दिले. धूत यांनी तेव्हा त्याला ५ लाख रुपये अदा केले. शिवाय, करार झाल्यानंतर एक कोटी रुपयांची पूर्तता केली. त्या बदल्यात राणाने सात ट्रॅक्टर, १२ रोटोव्हेटर व अन्य उत्पादने पाठवले.
एकही आश्वासन पाळले नाही
राणाने धूत यांना पहिले डीलर नेमण्याचा अधिकार दिला होता. परंतु पैसे मिळताच त्याने धूत यांच्या नावाचा गैरवापर करून परस्पर डीलर नेमले. सांगितल्याप्रमाणे विविध टक्केवारी, अनामत रक्कमेवरील व्याजाचे आश्वासनदेखील पाळले नाही. उत्पादन विक्री दरम्यान राणाच्या कंपनीला ऑटोमाेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाची परवानगीच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्या कुठल्याच उत्पादनाला चेसीस क्रमांक नसून आरटीओ पासिंगच मिळणार नव्हती. धूत यांनी आरोपींना वारंवार संपर्क केला. मात्र, आरोपींनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. अनेक डीलरकडून डिलरशिपसाठी लाखो रुपये उकळले. धूत यांनी कंपनीने सुरुवातीला दिलेले उत्पादने कंपनीला परत केली. मात्र, तरीही कंपनीने रक्कम दिली नाही. त्यामुळे धूत यांनी कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला. निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक विनोद मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.