कारमध्ये गळा आवळून पँथरचे शहराध्यक्ष असलेल्या उद्योजकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:50 PM2019-02-11T22:50:53+5:302019-02-11T22:52:04+5:30
मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रकाश कडूबा कासारे (४८, रा. मुकुंदवाडी), असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, कासारे यांची शेंद्रा एमआयडीसीमध्ये तुषार इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती अनेक वर्षांपासून बंद आहे. भारतीय दलित पँथरचे ते औरंगाबाद शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. मात्र रात्री घरी परतले नव्हते. नातेवाईक सतत त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते; मात्र फोन लागत नव्हता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कंपनीजवळ उभ्या कारच्या ड्रायव्हर सीटवर कासारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तेव्हा कासारे यांचा गळा आवळल्यासारखे दिसत होते. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
हॉटेलमध्ये झाले एकासोबत भांडण
कासारे हे रविवारी सायंकाळी शेंद्रा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये एका जणासोबत गेले होते. तेथे सोबतच्या एका व्यक्तीसोबत त्यांचे जोरदार भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र त्यांच्यासोबत भांडण करणारा कोण, हे कळू शकले नाही. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला.
कार्यकर्त्यांची घाटीत गर्दी
कासारे हे दलित पँथरचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच विविध नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घाटीत धाव घेतली.
सुरक्षारक्षकावर संशय
तुषार इंजिनिअरिंग कंपनीच्या सुरक्षेसाठी कासारे यांनी एक सुरक्षारक्षक नेमला होता. हा सुरक्षारक्षक सहकुटुंब कंपनीत राहतो. घटना घडल्यापासून तो गायब आहे. त्याच्यावरही पोलिसांना संशय आहे.
अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय?
पोलीस सूत्रांनी सांगितले की, कासारे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.