उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:18 IST2025-01-10T17:17:21+5:302025-01-10T17:18:21+5:30

उद्योगविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘लोकमत’चा ४३ वा वर्धापनदिन सोहळा

Entrepreneurs said, 'Lokmat' worked like a beacon to give direction to Marathwada | उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले

उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले

छत्रपती संभाजीनगर : मागील ४३ वर्षांपासून मराठवाड्यातील जनमानसांचा आवाज बनलेल्या लोकमतमराठवाडा आवृत्तीचा ४३ वा वर्धापनदिन गुरुवारी लोकमत भवनात उत्साहात पार पडला. यानिमित्त छत्रपती संभाजीनगरचे उद्योगविश्व विस्तारण्यासाठी मागील ५० वर्षांपासून तन-मन-धनाने अहोरात्र झटणाऱ्या उद्योजकांचा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या (डीएमआयसी) शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात टोयोटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, अथर एनर्जी आणि लुब्रीझोल या चार कंपन्यांनी ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांनी डीएमआयसीमध्ये जमीनही घेतली आहे. हे उद्योग येथे यावेत, यासाठी मागील काही वर्षांपासून सतत प्रयत्न करणाऱ्या सीएमआयए आणि मसिआ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मान्यवरांनी ‘लोकमत’ने ४३ वर्षांपूर्वी मराठवाड्यासारख्या मागास प्रदेशात पाऊल ठेवले आणि मराठवाड्याला दीपस्तंभासाररखी दिशा देण्याचे काम केल्याचे नमूद केले.

आमच्या पिढीने शून्यातून विश्व निर्माण केले
‘लोकमत’च्यावतीने माझ्यासह उद्योजकांचा सत्कार आयोजित केला. तसं पाहिलं तर कुठेतरी आपण यश सेलिब्रेशन करण्यास कमी पडतो. खऱ्या अर्थाने सत्कार दर्डाजींचा व्हायला हवा. तेसुद्धा आमच्या पिढीचे उद्योजक आहेत. ते टेक्नोक्रॉप्ट उद्योजक आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलाॅजीमध्ये लंडनला शिक्षण घेतले. त्यांनी स्वत:च्या स्वबळावर सशक्त नेतृत्व देऊन साम्राज्य निर्माण केले. त्यांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. जोखमीच्या क्षेत्रात ते यशस्वी झाले. आपल्या सगळ्यांच्यावतीने राजेंद्र दर्डा यांचा सत्कार करूया. उद्योगाशिवाय आपल्या देशात पर्याय नाही. कारखानदार रोजगार निर्माण करतो. समाजाला लागणारे साहित्य आणि सेवांचे निर्माण करतो. संपत्तीचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीएसटी, इन्कम टॅक्स भरतो. यातून सरकार चालते. आमच्या पिढीने संघर्ष केला. आमच्या पिढीने शून्यातून विश्व निर्माण केले. या पिढीने सामाजिक बांधीलकी कायम जपली आहे. या पिढीमध्ये उद्योजक एकत्र येऊन खूप काम करू शकतात. येथे काहीही हेवेदावे, द्वेष नाही. एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती असल्याने यशस्वी होतात. 
-नंदकुमार कागलीवाल, उद्योजक.

‘लोकमत’ संघटनांच्या पाठीशी राहिला 
औद्योगिक विकास समाजासमोर ठेवण्यासाठी सर्व औद्योगिक व्रत पाळून ‘लोकमत’ची वाटचाल सुरू आहे. आज येथे एका औद्योगिक कुटुंबामार्फत हा सत्कार म्हणजे चांगला योगायोग आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे हेसुद्धा एक यशस्वी उद्योजक आहे. यामुळे त्यांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कार करण्याचा हा सनातनी विचार आहे. याचा अर्थ धर्माचे रक्षण करणे, धर्म म्हणजे कर्तव्य होय. घनश्याम जालान, नानाजी भोगले यांनी सीएमआयएची स्थापना केली. सामाजिक कर्तव्य म्हणून सगळ्यांनी या संघटनेला बळ दिले. सन १९८० साली मसिआ संघटनेची स्थापना झाली. येथील उद्योजक प्रखरपणे उभे राहिले. उद्योजकांच्या अडचणीच्या वेळी संघटना उभ्या राहतात. ‘लोकमत’ संघटनांच्या पाठीशी राहिला नसता तर संघटनांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला नसता. 
-राम भोगले, उद्योजक.

माझ्यासह उद्योजकांचा केलेला सत्कार प्रेरणादायी 
सन १९८७ साली येथे शिक्षणासाठी आलो तेव्हा बजाज ऑटो आणि गरवारे या दोन मोठ्या कंपन्या होत्या. आज येथे टोयोटासारख्या जपानमधील नामांकित कंपनीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. जापनीज कंपनीची येथे इन्व्हेस्टमेंट येणे हे आपल्या शहराचे भाग्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांनी या कंपनीला येथे येण्यासाठी मन वळविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या कंपनीचा फायदा शहरासाठी करून घेणे महत्त्वाचे आहे. या कंपन्यांच्या आगमनामुळे सकारात्मक विचारांची श्रृंखला सुरू झाली आहे. आज ‘लोकमत’ने माझ्यासह उद्योजकांचा केलेला सत्कार हा प्रेरणादायी आहे.
- श्रीकांत बडवे, व्यवस्थापकीय संचालक बडवे ग्रुप.

Web Title: Entrepreneurs said, 'Lokmat' worked like a beacon to give direction to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.