कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला उद्योजकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:41 PM2019-04-09T23:41:55+5:302019-04-09T23:42:13+5:30
वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
वाळूज महानगर : वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे औद्योगिकनगरी व बजाजनगरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे.
गतवर्षी एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने इंदूरच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीमार्फत वाळूज एमआयडीसीतील पी.१८३ या भूखंडावर बीओटी तत्वावर बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कंपनीला ३ हेक्टर १८ गुंठे जमिन उपलब्ध करुन देण्यात आली. महिंद्रा कंपनीकडून १६ कोटी ७० लाख रुपये खर्च करुन हा अद्यावत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
आठवडाभरापूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, सहायक अभियंता सुधीर सुत्रावे, उद्योजक तथा एमईसीसीचे संस्थापक अध्यक्ष बी.एस.खोसे, मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, ए.के.सेनगुप्ता, प्रितीश चर्टजी, एन.श्रीराम, अशोक काळे, रविंद्र कोंडेकर, एस.जी.मुंदडा, अंकुश लामतुरे, विजय साळवे, आर.एन.कुलकर्णी, वसंत वाघमारे, अजय गांधी आदींच्या शिष्टमंडळाने या प्रकल्पाला मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महिंद्रा कंपनीचे सुंदर बाबु यांनी स्लाईड शोद्वारे या प्रकल्पाविषयी माहिती देऊन उद्योजकांच्या शंकाचे निरसन केले. प्रकल्पात कचºयापासून खत व सीएनजी गॅस निर्मिती करुन रास्त दरात त्याची विक्री केली जाणार असल्याचे कंपनीचे सुंदर बाबू यांनी सांगितले.
५० टन कचºयावर प्रक्रिया
या प्रकल्पात दररोज परिसरातील ३१ टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट कंपनीला दिले होते. मात्र, कंपनीकडून दररोज ४५ ते ५० टन कचºयावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या दररोज ७ ते ८ टन कचºयावर प्रक्रिया करुन बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. पुढील महिन्यात पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून या प्रकल्पामुळे जवळपास ५० जणांना रोजगार मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.