मराठवाड्यात रोज ५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचले प्रगणक; आतापर्यंत ६२ टक्के झाले काम
By विकास राऊत | Published: January 30, 2024 11:53 AM2024-01-30T11:53:34+5:302024-01-30T11:53:43+5:30
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात केली असून, सहा दिवसांत रोज ५ लाख कुटुंबांपर्यंत प्रगणक पोहोचल्याचा दावा प्रशासन करीत आहे. ३० लाख कुटुंबांच्या पाहणीचे काम झाले असून, ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मुदत आहे.
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सोमवारी राज्य मागासवर्ग आयोगाने विभागीय आयुक्तालयात बैठक घेत ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
आयोगाचे सदस्य गजानन खराटे, डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. प्रा. गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, जि. प. सीईओ डॉ. विकास मीना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, उपायुक्त जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची उपस्थिती होती.
जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच लातूर आणि नांदेड महापालिका आयुक्त ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. सर्वेक्षणादरम्यान वारंवार येणाऱ्या अडचणी पाहून सर्वेक्षण ॲप अपडेट केले आहे. त्यामुळे जुन्या ॲपचा डेटा सेव्ह करून आणि डाऊनलोड केल्यानंतर जुने ॲप काढून टाका व सर्वेक्षण अपडेटेड नवीन १.३ ॲपद्वारे वापरण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. जमीन अधिग्रहणाचाही आढावा घेण्यात आला.
वेळ वाढवून देण्याची मागणी
अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी सदस्यांसमोर मांडल्या. सर्वेक्षणाच्या सुरुवातीलाच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याने सर्वेक्षणाची गतीच मंदावली. ॲप बरोबर चालत नाही, ग्रामीण भागात रेंज नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम फारसे झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक अधिकाऱ्यांनी केली. मराठवाड्यात ५० लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा, व्यवसाय, रोजगारासाठी स्थलांतरित व शेतवस्तीवरील कुटुंबातील सर्वेक्षण करून नोंद घ्यावी, वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रगणकाच्या संख्येत वाढ करावी. ३१ जानेवारीपर्यंत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
जिल्हा..... किती टक्के काम?
छत्रपती संभाजीनगर ५३ टक्के
जालना ५५ टक्के
परभणी ५५ टक्के
हिंगोली ५५ टक्के
बीड ५५ टक्के
नांदेड ५५ टक्के
धाराशिव ५५ टक्के
लातूर ८४ टक्के