गाडीतून अतिरिक्त धूर निघाल्याने पर्यावरण मंत्री संतप्त; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:27 PM2018-04-19T20:27:57+5:302018-04-19T20:32:48+5:30
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
औरंगाबाद - पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याच झाले असे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी औरंगाबादेत आढावा घेत आहेत. या साठी पर्यावरण मंत्री देखील औरंगाबाद शहरात दाखल झाले. त्यांच्या एसकॉटमध्ये एमएच २० एडी १५१५ क्रमांकाची गाडी होती. त्या गाडीतून मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाचा धूर येत असल्याने रामदास कदम संतापले. त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात पोचल्यावर थेट पोलिसांना फैलावर घेतले. मी आता या शहराचा पालकमंत्री नाही म्हणून तुम्ही मला असल्या गाड्या देता का ? असा सवाल करत त्यांनी मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्र्यांनी राज्यातील सर्व पोलीस स्थानकातील अतिरिक्त धूर सोडणाऱ्या वाहनांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.