वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:31 AM2017-02-27T00:31:34+5:302017-02-27T00:32:38+5:30
जालना : गत काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
जालना : गत काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दिसून येते.
यंदा पडलेल्या पावसामुळे थंडीचे प्रमाणही जास्त होते. पारा ८ ते ९ अंशांवर घसरला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असली तरी सकाळचे तापमान अद्यापही घसरलेलेच आहे. थंडीचा पारा १५ ते १६ अंशांवर आहे. रविवारी सकाळी तापमान १६ अंश तर दुपारी उन्हाचा पारा ३४ अंशांवर होता.
त्यामुळे लहान बालके तसेच वयोवृद्धांमध्ये सर्दी, ताप, जुलाब, डोकेदु:खी आदी प्रकार वाढले आहेत. खाजगी सोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयातही अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज हजार ते बाराशे रुग्णांची तपासणी व औषधोपचार होतात.
आठवड्यापासून त्यापैकी दोनशे ते अडीचशे रुग्ण सर्दी, तापाचे असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी राठोर यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळेच हे रुग्ण वाढत असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येते. कडक उन्हामुळे दुपारी तसेच रात्री उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च हिट फेब्रु्रवारी महिन्यातच जाणवत असल्याचे चित्र आहे. यंदा जोरदार पावसामुळे उन्हाची तीव्रताही वाढेल असे जाणकार सांगतात.
ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत असली तरी प्राथमिक आरोय केंद्रात सुविधा मिळत नसल्याने बहुतांश ग्रामस्थ तसेच रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी अथवा औषधी नसते. याचा नाहक त्रास रुग्णांना सोसावा लागतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)