सम बलाने ‘धकधक’
By Admin | Published: September 16, 2014 12:30 AM2014-09-16T00:30:42+5:302014-09-16T01:33:44+5:30
संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेत निर्विवाद वर्चस्व मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला लागोपाठ ‘हादरे’ बसले. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले सदस्य थेट भाजपाच्या आश्रयाला गेल्याने महायुतीची ताकद वाढली.
संजय तिपाले , बीड
जिल्हा परिषदेत निर्विवाद वर्चस्व मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला लागोपाठ ‘हादरे’ बसले. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले सदस्य थेट भाजपाच्या आश्रयाला गेल्याने महायुतीची ताकद वाढली. आता युती व आघाडी दोघांकडेही २९-२९ असे बलाबल आहे. सत्तेच्या काठावर असलेल्या युती व आघाडीला आता फक्त एका सदस्याच्या ‘हात’भाराची गरज आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या अध्यक्षपदाची निवड रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे.
हक्काचे २९ सदस्य, काँग्रेस व अपक्ष मिळून दोन सदस्य तसेच आ. अमरसिंह पंडित यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे ५ शिलेदार अशा ३६ जणांची मोट बांधून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेवर अडीच वर्षांपूर्वी झेंडा रोवला. अडीच वर्र्षांचा कार्यकाळ संपल्याने २१ सप्टेंबर रोजी जि. प. मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यासाठी विशेष बैठक बोलावली आहे.
मधल्या काळात राष्ट्रवादीला एकामागून एक धक्के बसले. आ. विनायक मेटे, माजी आ. साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्या तिघांचेही प्रत्येकी एक सदस्य आहेत. त्यानंतर रमेश आडसकर यांनीही राष्ट्रवादीशी फारकत घेत थेट भाजपाचा तंबू गाठला. आडसकर भाजपात गेल्याने राष्ट्रवादीने पुन्हा तीन सदस्य गमावले. राष्ट्रवादीला बसलेल्या ‘हाबाड्या’त आणखी एक तांत्रिक भर पडली. राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमापूर गटातून निवडून आलेल्या सविता आहेर यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ अपक्ष व काँग्रेसच्या आशा संजय दौंड यांच्या मदतीसह २९ पर्यंत खाली आले.
दुसरीकडे भाजपाचे २० शिवसेनेचे २, रासप १ व राष्ट्रवादीतून भाजपात आलेले बापूराव धोंडे, उद्धव दरेकर, जयश्री मस्के, अर्चना आडसकर, कविता म्हेत्रे, भाग्यश्री गालफाडे यांच्यामुळे युतीचे संख्याबळ २३ वरुन २९ वर पोहोचले.
आता स्थिती अशी आहे की, युती व आघाडीकडील बलाबल सेम टू सेम आहे.त्यामुळे दोन्हीकडील नेत्यांचा कस लागला आहे. ३० हा ‘जादूई’ आकडा गाठून सत्तेचे वर्तुळ कोण पूर्ण करणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतील गटबाजी उघड आहे. निर्णयप्रक्रि येपासून दूर ठेवले जात असल्याची काही सदस्यांची कुरबूर आहे. अंतर्गत बेबनाव युती कितपत ‘कॅश’ करते? की राष्ट्रवादीच भाजपावर कुरघोडी करते? हे २१ सप्टेंबरलाच कळेल.
यांच्या भूमिकेकडे नजरा!
अपक्ष सदस्य शिवाजी डोके हे राज्यमंत्री सुरेश धस यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ते भाजपाच्या मदतीला धावतील अशी शक्यता कमीच आहे. दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील आ. प्रकाश सोळंके यांना मानणारे काही सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे;पण त्या सर्वांची आ. सोळंके यांनी मनधरणी केली आहे. त्यामुळे या सदस्यांच्या भूमिकेने देखील लक्ष वेधले आहे.
युतीचे काही सदस्य सहलीवर आहेत. पुणे, राजस्थान, कुलूमनाली असा दौरा त्यांनी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादीचे सदस्य देखील सहलीवरच आहेत; पण ते गटागटात विखूरलेले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे, सावित्री नारायण शिंदे, संदीप क्षीरसागर यांची नावे आघाडीवर आहेत. तर भाजपाकडून मदनराव चव्हाण, अर्चना आडसकर, जयश्री राजेंद्र मस्के यांच्या नावाची चर्चा आहे.
काँग्रेसच्या एकमेव सदस्या आशा संजय दौंड या सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्या युतीच्या बाजूने उभ्या राहतात की आघाडी धर्म निभावतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘वेट अँड वॉच’ अशी मोजकीच प्रतिक्रिया दिली.