जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांत आढळल्या त्रुटी !
By Admin | Published: May 2, 2017 11:45 PM2017-05-02T23:45:51+5:302017-05-02T23:47:09+5:30
लातूर : धडक मोहिमेत ३९२ पैकी २५६ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील २५६ पैकी ३४ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत.
लातूर : धडक मोहिमेत ३९२ पैकी २५६ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील २५६ पैकी ३४ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत. प्रशिक्षित कर्मचारी, पावती बुक, फायर सेफ्टी तसेच ओपीडी व आयपीडीचे रेकॉर्ड नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्रुटी आढळलेल्या सर्व रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत.
आरोग्य विभाग, महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे लातूर जिल्ह्यातील २५६ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर १५० पैकी १४० सोनोग्राफी केंद्र, १२१ पैकी ११६ एमटीपी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. १४ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत २३ पथकांद्वारे धडक मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
प्रशिक्षित एएनएम व जीएनएम नसणे, रुग्णालय परिसर योग्य नसणे, आयपीडी, ओपीडीचे रेकॉर्ड नसणे, रेकॉर्ड ठेवण्यात सातत्य नसणे, एफडब्ल्यू सर्टिफिकेट उपलब्ध नसणे, तसेच काही कागदपत्र नसल्याचे जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांत आढळले आहे. या रुग्णालयांमध्ये लातूर शहरातील ११ रुग्णालये आहेत. अहमदपूर तालुक्यात २० तर औसा शहरातील तीन रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत. धाड मोहिमेतील पथकाने हा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केला आहे.