'मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना करा'; राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 02:36 PM2021-07-28T14:36:20+5:302021-07-28T14:43:50+5:30
Establish AIIMS in Marathwada : प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे; परंतु मराठवाड्याला ‘एम्स’ची गरज आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची (एम्स) स्थापना करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली. यासंदर्भात निवेदन देऊन डाॅ. कराड यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
प्रधानमंत्री श्री @narendramodi Ji यांच्या कार्यकाळात आरोग्य सुविधा उत्तम होत आहेत. याच अनुषंगाने आज आरोग्यमंत्री श्री @mansukhmandviya ji यांची भेट झाली. मराठवाड्यात एक AIIMS स्थापन करण्यासाठी मी त्यांना निवेदन दिले.#drkaradupdatespic.twitter.com/GK3lVqkWcW
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) July 27, 2021
प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे; परंतु मराठवाड्याला ‘एम्स’ची गरज आहे. ‘एम्स’मुळे केवळ वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणच मिळणार नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची तूट भरून निघेल. मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना झाली तर विभागातील रुग्णांना सुपर स्पेशालिटी उपचार तर मिळतील, त्याचबरोबर विभागातील डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढीला मदत होईल. ‘एम्स’मुळे रोजगार निर्मिती होऊन फॅकल्टी आणि नाॅन फॅकल्टी अशा पदांची जवळपास ३ हजार पदे भरली जातील. यामुळे विभागातील आरोग्य यंत्रणेतील मूलभूत सुविधा अधिक भक्कम हाेतील, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण मिळण्यास मदत होईल, असे डाॅ. कराड यांनी नमूद केले आहे.