पुरूष आयोग स्थापना करा; पत्नीपीडितांनी कावळ्याची पूजा करून केला पुरुष हक्क दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:02 PM2020-11-20T16:02:59+5:302020-11-20T16:05:31+5:30
पूर्वीपासून पुरुषच महिलांचा छळ करीत असल्याचा समज निर्माण झाल्यामुळे पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केले जाते.
वाळूज महानगर : जागतिक पुरुष हक्क दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१९) करोडी येथील आश्रमात पत्नीपीडितांनी कावळ्याची पूजा करून पुरुष हक्क दिन साजरा केला. याप्रसंगी पत्नीपीडितांनी जोरदार घोषणाबाजी करून महिलांप्रमाणे पुरुषांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करण्याची एकमुखी मागणी केली.
पूर्वीपासून पुरुषच महिलांचा छळ करीत असल्याचा समज निर्माण झाल्यामुळे पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केले जाते. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाची समाज व शासनाने दखल घ्यावी, यासाठी करोडी येथील पत्नीपीडित आश्रमात जागतिक पुरुष हक्क दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. आश्रमाचे अध्यक्ष भरत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, जगदीश शिंदे, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, रामेश्वर नवले आदी पत्नीपीडितांनी कावळ्याची मनोभावे पूजा करून पत्नीला सद्बुद्धी देण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना केली.
भरत फुलारे म्हणाले, महिलांवर अत्याचार झाल्यास समाज व प्रशासन तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते. मात्र, पुरुषांवरील अन्यायाची कुणीही गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे पुरुषांत नैराश्य येत असून, त्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. पुरुषदेखील सहनशक्तीचे प्रतीक असून, त्याच्यावरील अत्याचाराची समाज व शासकीय यंत्रणेने दखल घेण्याची अपेक्षा पत्नीपीडितांनी व्यक्त केली. ‘जागतिक पुरुष दिनाचा विजय असो’, ‘पुरुषांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘पोटगीचा कायदा रद्द करा’ आदी घोषणा देऊन पत्नीपीडितांनी जागतिक पुरुष हक्क दिन साजरा केला.
पुरुष आयोग स्थापन करा
महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र महिला आयोग आहे. या आयोगाच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्यात येतो. मात्र, पुरुषांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नाही.