सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करा; आमदार सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 07:00 PM2020-02-27T19:00:44+5:302020-02-27T19:09:46+5:30

विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी

Establish a separate Nagar Parishad for Satara-Deolai: Satish Chavan | सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करा; आमदार सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करा; आमदार सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसोयी-सुविधांचा अभावदानवे यांची निधीची मागणी

औरंगाबाद : औरंगाबादेतील सातारा-देवळाईच्या विकासासाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी बुधवारी (दि.२६) विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली.

आ. चव्हाण यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. सातारा-देवळाई परिसरासाठी तत्कालीन आघाडी सरकारने नगरपालिका स्थापनेची अधिसूचना काढली होती. मात्र २०१६ मध्ये सातारा-देवळाई परिसराचे दोन वॉर्ड करून ते औरंगाबाद महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले. महापालिकेत समावेश झाल्याने आपल्याला चांगल्या सोयी-सुविधा मिळतील, अशी तेथील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र महानगरपालिकेने याठिकाणी अद्यापही कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे सभागृहात सांगितले. 

ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्त्याचा प्रश्न चार वर्षांपासून रखडलेलाच आहे. सेवा-सुविधांअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भावनांची मोडतोड करून नगर परिषद दोन वॉर्डात समाविष्ट करून समस्यांचा डोंगर उभा केला आहे.  त्यामुळे सातारा-देवळाईसाठी पुन्हा स्वतंत्र नगर परिषद स्थापन करून त्यासाठी शासनाने आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी सभागृहात लावून धरली. 

आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. शासनाकडून या परिसरासाठी विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, येथील सोयी-सुविधांचा अभाव लक्षात घेता अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूददेखील करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात याच अधिवेशनात पालकमंत्री व सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

दानवे यांची निधीची मागणी
सातारा- देवळाई विषयावर लक्षवेधी चर्चा करताना या भागाच्या विकासासाठी किमान ४०० कोटींची आवश्यकता आहे, अशी मागणी आ. अंबादास दानवे यांनी सभागृहात चर्चा करताना केली.

Web Title: Establish a separate Nagar Parishad for Satara-Deolai: Satish Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.