विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन; कुलगुरूंनी अर्थसंकल्पात केली ५० लाख रुपयांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:33 PM2018-06-28T18:33:26+5:302018-06-28T18:36:24+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था महिनाभरात कार्यान्वित करण्याचा निर्णय याविषयी स्थापन केलेल्या समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी दिली. या संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
विलासराव देशमुख यांचे मराठवाड्याच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने विद्यापीठात संशोधन संस्था स्थापन करण्याचा ठराव विद्यापीठाच्या २० मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला होता. या ठरावानुसार याविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. या बैठकीला समितीचे सदस्य पंकज भारसाखळे, विजय सुबुकडे उपस्थित होते, तर संजय निंबाळकर, प्रा. संभाजी भोसले हे अनुपस्थित होते. मात्र, त्यांना बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. देहाडे यांनी सांगितले.
विलासराव देशमुख संशोधन संस्थेच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी खाजगी संस्थेकडून महिनाभरात एक सविस्तर अहवाल तयार करून घ्यावा, संस्थेचा संचालक नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि विलासराव देशमुख यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या मान्यतेसाठी एक प्रस्ताव राज्य सरकारला आणि निधीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. देहाडे यांनी दिली.
ग्रामीण संशोधनासाठी तीन संस्था
विद्यापीठात ग्रामीण भागातील समस्या, शेती उपायांवर संशोधन करण्यासाठी चार वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला दीडशे कोटी रुपये निधी देण्याची घोषणा २०१६ मध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. तेव्हापासून आतापर्यंत एक रुपयाही सरकारने दिला नाही. या संस्थेत मागील शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नव्हता. याशिवाय विद्यापीठात ग्रामीण विकास अध्यासन केंद्रही कार्यान्वित केलेले आहे. यानंतर विलासराव देशमुख संशोधन संस्था ही ग्रामीण भागावर संशोधन करणारी तिसरी संस्था असणार आहे.