अत्याचारप्रकरणी विशेष पथकाची स्थापना
By Admin | Published: September 7, 2016 12:07 AM2016-09-07T00:07:13+5:302016-09-07T00:37:45+5:30
औरंगाबाद : अल्पवयीन शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, सिडको ठाण्यातील व्हिडिओ
औरंगाबाद : अल्पवयीन शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, सिडको ठाण्यातील व्हिडिओ फुटेजची तपासणी करून आरोपी शिक्षकाला ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ देणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी येथे सांगितले.
आठवर्षीय चिमुकलीचे शोषण केल्याप्रकरणी अहेमद खान आमिर खान या नराधम शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. अहेमद खानशिवाय तीन रिक्षाचालक आणि एका संगणक शिक्षकाने ‘त्या’ मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आपणावर राजकीय मंडळी दबाव टाकत असून, आरोपीला सन्मानाची वागणूक मिळत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, सुनीता आऊलवार आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
पोलीस आयुक्त म्हणाले की, अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या शिक्षकास १२ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित मुलगी अद्याप आजारी असून, तिचा जबाब घेतल्यानंतर उर्वरित आरोपी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.