मराठी भाषा विद्यापीठासाठी अभ्यास गटाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 05:22 PM2019-09-04T17:22:39+5:302019-09-04T17:25:01+5:30

अभ्यास गटाच्या शिफारशींचा अहवाल राज्य शासनाला देणार

Establishment of Study Group for Marathi Language University | मराठी भाषा विद्यापीठासाठी अभ्यास गटाची स्थापना

मराठी भाषा विद्यापीठासाठी अभ्यास गटाची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देभाषा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय  मराठी विषयाचा संबंध केवळ रोजगाराशी लावू नये

- राम शिनगारे 

औरंगाबाद : मराठी भाषेतील संशोधन, संवर्धनासाठी मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  हा अभ्यास गट देशभरातील भाषेसंदर्भात असलेली विद्यापीठे, संस्थांना भेटी देऊन अहवाल सादर करील. तो अहवाल समितीतर्फे राज्य शासनाला सादर केला जाणार  आहे.

राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि विकासासाठी भाषा सल्लागार समितीची स्थापना केली आहे. या समितीची दुसरी बैठक चार दिवसांपूर्वी अटल स्मृती उद्यान, मुंबई येथे झाली. समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला नांदेड येथील साहित्यिक डॉ. केशव देशमुख यांच्यासह २० पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते. या बैठकीत  मराठीचे विद्यापीठ की, राष्ट्रीय स्तरावरील मराठीचे संशोधन केंद्र निर्माण करावे याविषयी चर्चा करण्यात आली. 

संशोधन केंद्र म्हटले की, मर्यादा येतात, आवाका लहान होतो आणि ‘विद्यापीठ’ या संकल्पनेत जी एक अभ्यास, ज्ञान, संशोधन, संवर्धन याविषयी समूहस्तरावरील व्यापकता आहे. ती व्यापकता एखाद्या केंद्रात मावत नाही म्हणून मराठीचे विद्यापीठ स्थापन करण्याचाच मुद्दा बैठकीत चर्चिला गेला. सरकारची भूमिकाही त्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे देशभरात भाषानुसार स्थापन केलेल्या विद्यापीठ, शिक्षण संस्थांना भेट देऊन सविस्तर अभ्यास करण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली.  

मराठी विषयाचा संबंध केवळ रोजगाराशी लावू नये
काही विद्यापीठांत विद्यार्थिसंख्या रोडावत आहे, तर काही विद्यापीठांत समाधानकारक आहे. त्याचे उत्तर बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या संधी यात सापडते. मात्र, केवळ मराठी विषयाचा संबंध फक्त रोजगाराशी लावू नये. कारण, परंपरेचा, संस्कृतीचा, समाजाचा, वाचन संस्कृतीचा मुद्दा मराठीमधून बाजूला करता येणार नाही, असेही बैठकीत स्पष्ट केले. याविषयी मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात नावीन्यता आणण्यावर एकमत झाले.

शब्दकोशाला वेग देण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, सरकारचा मराठी विभाग, माहिती संचालनालय आणि भाषा सल्लागार समिती यांच्याशी चर्चा करून तसेच त्या त्या संस्थांतील तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या माहिती, ज्ञानाचा उपयोग करत कोश वाङ्मयाला गती मिळाली. कृषी, शिक्षण, विधि यासंबंधी कोश वाङ्मयाला वेग मिळाला आहे. हे प्रकल्प लवकरच समाजासमोर नेण्याबद्दल सकारात्मक पावले बैठकीत उचलण्यात आली.   

अहवाल राज्य शासनाला देण्यात येईल 
मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. हा अभ्यास गट भाषेच्या विद्यापीठ, संस्थांना भेटी देऊन अहवाल तयार करेल. हा अहवाल भाषा सल्लागार समितीमार्फत राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 
- डॉ. केशव देशमुख, सदस्य, भाषा सल्लागार समिती, मुंबई

Web Title: Establishment of Study Group for Marathi Language University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.