अंगणवाडीस्तरावर होणार ग्राम बालविकास केंद्र स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:05 AM2017-09-05T01:05:13+5:302017-09-05T01:05:13+5:30
जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राची स्थापना करून मुलांना १२ आठवडे पोषक आहार दिला जाणार आहे.
कुपोषण मुक्त महाराष्ट्रासाठी राज्यशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले असून त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महिला व बालविकास अधिकारी एस. डी. लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाºयांची बैठक घेतली.
ग्राम बाल विकास केंद्रामार्फत कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी पुढील पंधरा दिवस प्रत्येक गावात मोहीम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यामध्ये ० ते सहा वयोगटातील मुलांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. यासाठी अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावातील कमी वजनाच्या बालकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. एकदा संख्या निश्चित झाल्यानंतर त्यानुसार ग्राम बाल विकास केंद्र स्थापन केले जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. बारा आठवड्यांच्या आहार वाटप कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाही तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका काय आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार अंगणवाड्या असून अंगणवाडी सेविका व मदतनीसांची संख्या साडेतीन हजारांपर्यंत आहे. या अंगणवड्यांध्ये येणाºया लाभार्थी बालकांची संख्या मोठी आहे.