विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ‘मर्ज’ प्रकल्प मंजूर; देशातून केवळ दोनच विद्यापीठांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:48 PM2020-12-03T17:48:42+5:302020-12-03T17:51:02+5:30
‘युरोपियन युनियन‘च्या वतीने आशियातील विविध विद्यापीठांसाठी प्रकल्पांतर्गत निधी देण्यात येतो.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ‘मर्ज‘ (एमईआरजीई) प्रकल्प मंजूर करण्यात आला. दक्षिण आशियातील उच्चशिक्षणाचे सक्षमीकरण करण्यासाठी भारतातील दोन विद्यापीठांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली, अशी माहिती ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स’च्या संचालक डॉ. वंदना हिवराळे यांनी दिली.
‘युरोपियन युनियन‘च्या वतीने आशियातील विविध विद्यापीठांसाठी प्रकल्पांतर्गत निधी देण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आजपर्यंत इरासमस मुंडस, इकासा, युनाटेल आदी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, तसेच पोर्तुगाल, स्पेन, तुर्कस्थान आदी देशांसमवेत ‘एक्स्चेंज प्रोग्राम’अंतर्गत संशोधक, प्राध्यापकांना पाठविण्यात आले आहे. ‘मर्ज’ प्रकल्पासाठी भारतातून दोन विद्यापीठांची निवड केली. यामध्ये अण्णा विद्यापीठाचा (चेन्नई)देखील समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाला आगामी तीन वर्षांसाठी ७५ हजार युरोचा निधी प्राप्त झाला आहे. इकासाअंतर्गत ‘मर्ज’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
इटली, स्पेन व रुमानिया या देशांतील जिनोआ विद्यापीठ, अॅगोरा इन्स्टिट्यूट व युनिव्हर्सिटी लुसिन बागा दिन सिबू या संस्थांचा या प्रकल्पात समावेश आहे. भारतासह आशियातील नेपाळ व आफगाणिस्तान या तीन देशांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उच्चशिक्षण संस्था कुशल मनुष्यबळ व तरुणांना तांत्रिक ज्ञान पुरविण्याचे काम करीत असतात. आशिया, आफ्रिका खंडातील विद्यार्थी तसेच युरोप व अमेरिका खंडातील विकसित देशातील विद्यार्थी भारतासारख्या देशात शिक्षणासाठी यावेत, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण व्हावे, या हेतूने हा निधी देण्यात आला आहे. याअंतर्गत १८ हजार युरो यंत्रसामग्रीसाठी मिळणार आहेत, तर प्रशिक्षण, कार्यशाळा, वेबिनारसारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे डॉ. हिवराळे म्हणाल्या.
संशोधनाला गती देणार : कुलगुरू
‘इन्क्युब्युशन सेंटर’च्या माध्यमातून संशोधन व नवोन्मेष याला प्राध्यान्य देत आहे. ‘कोविड-१९’ नंतरचे जीवन ‘न्यू नॉर्मल लाईफ’ म्हणून ओळखले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. युरोपियन युनियनने ‘मर्ज’ प्रकल्पासाठी निवड केली ही आनंदाची बाब आहे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.