'या' संसर्गजन्य आजारामुळे दोन पाळीव घोड्यांना दयामरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:20 PM2020-02-27T17:20:41+5:302020-02-27T17:26:39+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांचीही तपासणी सुरू केली आहे.
औरंगाबाद : कोकणवाडी भागात दोन पाळीव घोड्यांना ग्लँडर्स आजाराची लागण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी तातडीची बैठक घेऊन दोन्ही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेतला. या आजाराची लागण नागरिकांना होऊ शकते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांचीही तपासणी सुरू केली आहे.
घोडा, गाढव आदी प्राण्यांमध्ये ग्लँडर्सची लक्षणे अलीकडे आढळून येत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या माणसांनाही रोगाची लागण होऊन मृत्यू होऊ शकतो. पशुसंवर्धन विभागाला शासनाने सतर्कतेचा आदेश दिला. त्यानंतर या विभागाने शहरातील घोड्यांची तपासणी सुरू केली. कोकणवाडीतील जनार्दन तांबे यांच्या दोन पाळीव घोड्यांना ग्लँडर्स या आजाराची लक्षणे असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाली होती. त्यानुसार रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली असता, त्यांना ग्लँडर्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या घोड्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा गंभीर आजार असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, सहायक आयुक्त डॉ. डी.एस. कांबळे, वल्लभ जोशी, डॉ. राठोडकर, महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एस. नाईकवाडे यांच्या समितीने या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी या दोन्ही घोड्यांना इंजेक्शन देऊन मारले जाणार असल्याचे डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
परिसरात तपासणी
महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोकणवाडी परिसरात सर्वसामान्य नागरिकांचीही तपासणी सुरू केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
शहरात ८२ घोडे...
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सध्या ८२ घोडे आहेत. दोन घोड्यांना ग्लँडर्स या भयंकर रोगाची लागण झाल्यामुळे आता इतर घोड्यांची तपासणी केली जात आहे. शहराच्या अनेक भागात पाळलेले घोडे लग्न समारंभासाठी भाड्याने दिले जातात.