उष्णतेच्या लाटेने बाष्पीभवन वाढले; मराठवाड्यातील प्रकल्पांत भर उन्हाळ्यात ५१ टक्के पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:31 AM2022-04-28T11:31:49+5:302022-04-28T11:32:15+5:30
मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५५ प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यातील लहान, मोठे व मध्यम जलप्रकल्प भर उन्हाळ्यात एप्रिल संपण्यापूर्वीच ५१ टक्क्यांवर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणी कमी झाले आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून पाण्याचे बाष्पीभवन वाढू लागले आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील ७.२७५ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याची वाफ (बाष्पीभवन) झाली आहे. मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५५ प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत. २११ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.
गेल्या पावसाळ्यात विभागातील सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा २०२०-२१ च्या तुलनेत बऱ्यापैकी असला तरी तापमान वाढल्याचा फटका जलप्रकल्पांना बसू लागला आहे. मागच्या वर्षी एप्रिल अखेरीस ५५ टक्क्यांच्या आसपास जलसाठा विभागात होता. मे महिन्यात आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीचा फटका जलाशयांना
मराठवाड्यातील जलप्रकल्पांना तापमान वाढीचा फटका बसला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील बाष्पीभवन वाढत आहे, तर लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणी वेगाने आटत आहे. ५० ते ७५ टक्के पाणी ८ मध्यम प्रकल्पांत आहे. ७५ टक्के पाणी फक्त एका प्रकल्पात आहे.
जायकवाडीत ५६ टक्के पाणी
जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मध्यम प्रकल्पांत ४५ टक्के, लघु प्रकल्पांत ३१ टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ टक्के, इतर बंधाऱ्यांत ८९ टक्के जलसाठा सध्या आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लघु आणि मध्यम प्रकल्पांत बऱ्यापैकी साठा आहे.
विभाग प्रकल्पांतील साठा असा
मोठे प्रकल्प -११- ५९.५२ टक्के जलसाठा
मध्यम प्रकल्प - ६५- ४५.२ टक्के जलसाठा
लघु प्रकल्प- ७४९- ३१.६१ टक्के जलसाठा
गोदावरी बंधारे- १५- ४७.९८ टक्के जलसाठा
इतर बंधारे- २५ - ८९.१४ टक्के जलसाठा
एकूण - ८७५- ५१.९५ टक्के जलसाठा