चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:47 IST2025-04-16T17:45:26+5:302025-04-16T17:47:28+5:30
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो.

चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले
- दादासाहेब गलांडे
पैठण : तालुक्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही दररोज होणाऱ्या पाणी उपशापेक्षा ६ पट वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.
पैठण तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यावर होत आहे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन पटींनं जास्त आहे. मागील वर्षी १५ एप्रिल रोजी धरणात फक्त १५.२० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात याच दिवशी ४७.३९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात सध्या १७६७.०१ दलघमी पाणीसाठा असून त्यात १०२८.९० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षासाठी जायकवाडी धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नव्हते. तसेच पिण्याच्या पाण्यातही काही ठिकाणी कपात करण्यात आली होती.
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दररोज केवळ ०.२९ दलघमी पाणी उपसा केला जातो; मात्र उष्णता वाढल्यामुळे दररोज जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यात ५५.२८५ दलघमी बाष्पीभवन झाले असून मंगळवारी बाष्पीभवनाचा वेग १.९८८दलघमी होता. यावर्षी जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते. धरणात १११.२५५६ टीएमसी पाणी आले. तर विसर्ग धरणातून ८६२.९६१५ टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.
२४३.७३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन
जायकवाडी धरणातील पाण्याचे डिसेंबर २०२४ मध्ये २०.६१४ दलघमी बाष्पीभवन झाले तर जानेवारीमध्ये २०२५ मध्ये २४.६६८ दलघमी, फेब्रुवारीत २९.८१४ दलघमी, मार्चमध्ये ५५.२८५ दलघमी बाष्पीभवन झाले. १ जुलै २०२४ ते आजपर्यंत जायकवाडी धरणातील २४३.७३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात नाही
जायकवाडी धरणात आज रोजी ४७.३९ टक्के पाणीसाठा असून, डाव्या कालव्यातून २१५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बाष्पीभवनाचा आजचा वेग १.९८८ दलघमी आहे. धरणातून पिण्यासाठी जेवढे पाणी दररोज उपासले जाते, त्याच्या सहा पटींनी बाष्पीभवन होत आहे. यावर्षी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही.
- विजय काकडे, शाखा अभियंता.
तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार?
पैठण तालुक्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या काही वेबसाइटनी व्यक्त केला आहे. द वेदर चॅनल नावाच्या वेबसाइटने १६ एप्रिल रोजी ४०, १७ व १८ रोजी ४१ अंश आणि १९ व २० रोजी ४२ अंश सेल्सिअस तापमान पैठणचे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच २१ व २२ रोजी ४२, तर २३ एप्रिल रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमान राहील, असे या वेबसाइटचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढील काळात पुन्हा जायकवाडी धरणातील तापमान वाढणार आहे.