राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बहीण-भावाची ताटातूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:51 AM2018-08-26T00:51:02+5:302018-08-26T00:51:36+5:30
लहान बहिणीसह मामे-बहिणीला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या एका भावावर शनिवारी काळाने झडप घातली. वाळूज महानगरातील गरवारे कंपनीसमोर भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बहीण भावाची ताटातूट करणाºया या घटनेने औरंगाबादेतील क्रांतीनगरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दोन बहिणी बालंबाल बचावल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : लहान बहिणीसह मामे-बहिणीला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या एका भावावर शनिवारी काळाने झडप घातली. वाळूज महानगरातील गरवारे कंपनीसमोर भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बहीण भावाची ताटातूट करणाºया या घटनेने औरंगाबादेतील क्रांतीनगरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दोन बहिणी बालंबाल बचावल्या.
याविषयी अधिक माहिती अशी की, आशिष विजय गायकवाड (२३, रा. क्रांतीनगर, औरंगाबाद) हा महाविद्यालयीन तरुण आपली मामे-बहीण प्रीती विलास वंजारे (१८) हिला तिच्या घरी (बकवालनगर, ता. गंगापूर) येथे तिला सोडण्यासाठी निघाला होता.
दरम्यान आशिष याची लहान बहीण श्रुती गायकवाड हिने त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट धरल्यामुळे आशिष याने या दोन्ही बहिणीला सोबत घेऊन दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच-२० डीझेड ६७३६) वर क्रांतीनगर येथून बकवालनगरकडे जाण्यासाठी निघाले होते. शहरातून तिघे बहीण-भाऊ दुचाकीवर बकवालनगरकडे जात असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाºया ट्रक (क्रमांक एमएच-१६ बी.३५४४) च्या चालकाने आशिष गायकवाड याच्या दुचाकीस जोराची धडक दिली.
ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून आशिष हा ट्रकच्या चाकाखाली सापडला तर श्रुती व प्रीती या दोघी रस्त्यावर जाऊन पडल्या. या दुर्दैवी अपघातात ट्रकच्या चाकाखाली आशिष चिरडला गेल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. हा अपघात पाहतााच औरंगाबाद- नगररोडवरून ये-जा करणाºया वाहनधारकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दुचाकीवरून खाली पडलेल्या दोघा बहिणींना सुरक्षितस्थळी हालवून या अपघाताची माहिती वाळूज पोलिसांना दिली.
या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण बुट्टे, पोहेकॉ. संजय शिंदे आदींनी अपघातस्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने चेंदामेंदा झालेल्या आशिषचा मृतदेह टू-मोबाईलने शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.
या अपघाताची माहिती मिळताच बकवालनगरातील प्रीती वंजारे हिचे आई-वडील, नातेवाईक व नागरिकांनी अपघातस्थळ गाठून किरकोळ जखमी झालेल्या प्रीती वंजारे व आशिषची बहीण श्रुती गायकवाड या दोघींना उपचारासाठी पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या दोन्ही बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून श्रुती हिच्या हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या असून प्रीती हिच्या उजव्या हाताला जखम झाली असून, दोघींना मुका मार लागला आहे.
भाऊराया न दिसल्याने बहिणी झाल्या अबोल...
या अपघातात बालंबाल बचावलेल्या श्रुती व प्रीती या दोघींना नातेवाईकांनी पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. आशिष हा अपघातात जखमी असून, त्याच्यावर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगून नातेवाईक या दोघींना धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नातेवाईकांचे अश्रू पाहून काहीतरी अघटित घडले असल्याचे या दोघींना जाणवत आहे. अपघात झाल्याचा या दोघींना चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. भाऊ दिसत नसल्याने त्या दोघीही अबोल झाल्याचे दिसले. नातेवाईकही हुंदके आवरत या दोघींचे सांत्वन करीत असल्याचे विदारक चित्र रुग्णालयात पाहावयास मिळाले.
तिघे बहीण भाऊ एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थी
या अपघातात ठार झालेला आशिष गायकवाड हा शहरातील विवेकानंद महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत होता. याच महाविद्यालयात आशिष याची लहान बहीण श्रुती गायकवाड ही बारावीत तर मामे-बहीण प्रीती वंजारे ही बी.कॉम.चे शिक्षण घेत आहेत.
या अपघातात आशिष गायकवाड याचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, श्रुती व प्रीती या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत.