मृत्यूनंतरही ‘ते’ अवयवदानातून आजही कुठेतरी जिवंत; नातेवाईकांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:41 PM2020-08-13T13:41:18+5:302020-08-13T13:48:18+5:30

४ वर्षांत २५ जणांचे अवयवदान, अनेकांना नवे आयुष्य

Even after death, ‘they’ are still alive somewhere today from organ donation; Feelings of relatives | मृत्यूनंतरही ‘ते’ अवयवदानातून आजही कुठेतरी जिवंत; नातेवाईकांच्या भावना

मृत्यूनंतरही ‘ते’ अवयवदानातून आजही कुठेतरी जिवंत; नातेवाईकांच्या भावना

googlenewsNext
ठळक मुद्देदरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन पाळण्यात येतो. आई-वडील  म्हणतात, मुलगा इतरांच्या रूपात

- संतोष हिरेमठ 
औरंगाबाद : कोणाला हृदय हवे होते, कोणाला किडनी, तर कुणाला यकृत. मराठवाड्यात गेल्या ४ वर्षांत २५ जणांनी या जगातून जाताजाता अवयवदानाच्या रूपाने इतरांना नवे आयुष्य दिले. त्यामुळे मृत्यूनंतरही  ‘ते’ आजही कुठेतरी आहेत, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. 

दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन पाळण्यात येतो. यानिमित्त अवयवदान झालेल्या व्यक्तीच्या (ब्रेनडेड) आणि अवयव प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठवाड्यात औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. त्यानंतर  २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण झाले.

मराठवाड्यात २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत २५ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. त्यातून अनेकांना नवीन आयुष्य मिळाले; परंतु यावर्षी अवयवदानाला कोरोनाने खीळ बसली आहे.  ७ महिने उलटूनही आतापर्यंत एकही अवयवदान झालेले नाही. अवयवदान आणि प्रत्यारोपण करण्यासाठी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार न करणारे डॉक्टर, रुग्णालय मिळणे अशक्य आहे. अन्य जिल्ह्यात अवयव पाठविण्यास अडचणी आहेत. 

२३० रुग्णांना प्रतीक्षा किडनीची
मराठवाड्यात २३० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. याबरोबरच ७० रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. कोरोनामुळे अवयवदान थांबल्याने अवयवांसाठी गरजू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यारोपणासाठी वेळीच किडनी, यकृत प्राप्त होत नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात येत आहे.

साडेसहा वर्षांची मुलगी घेतेय मोकळा श्वास
औरंगाबादेत जून २०१८ मध्ये झालेल्या १५ वर्षीय ब्रेनडेड मुलाच्या अवयवदानाने जालना येथील साडेचार वर्षांच्या मुलीला हृदय मिळाले. आता ही मुलगी साडेसहा वर्षांची झाली आहे. तिचे वडील म्हणाले, हृदय मिळण्यापूर्वी एक एक श्वास विकत घेतल्याप्रमाणे ती जगत होती; परंतु आता ती मोकळा श्वास घेत आहे. हे कोणाच्या तरी अवयवदानानेच शक्य झाले आहे.

आई-वडील  म्हणतात, मुलगा इतरांच्या रूपात
अपघातात ब्रेनडेड झालेल्या १५ वर्षीय प्रतीकच्या अवयवदानाने इतरांना जीवदान मिळाले. त्याच्या जाण्याने त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला; परंतु अवयवांच्या रूपात आजही तो कोणामध्ये तरी आहे, याचे त्यांना समाधान आहे, असे प्रतीकचे नातेवाईक लिंबाजी वाहूळकर म्हणाले.

डॉक्टर, रुग्णालयाची अडचण
कोरोनाच्या परिस्थितीमुळे अवयवदानात अडथळा येत आहे. अवयवदानासाठी, प्रत्यारोपणासाठी कोरोनाचे रुग्ण न हाताळणारे डॉक्टर, रुग्णालय मिळणे अशक्य आहे. प्रत्येक रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे अवयवदान पुन्हा सुरू होण्यासाठी काही कालावधी लागेल.
- डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी 


अवयवदानाचे            प्रमाण
वर्ष        अवयवदान
२०१६        ९
२०१७        ६ 
२०१८        ७ 
२०१९        ३ 
एकूण        २५ 

Web Title: Even after death, ‘they’ are still alive somewhere today from organ donation; Feelings of relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.