चार दिवसानंतरही निळवंडेचे पाणी जायकवाडीत पोहोचेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:33 AM2018-11-18T00:33:14+5:302018-11-18T00:33:42+5:30
निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.
निळवंडेतून १४ नोव्हेंबरपासून २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून सुरू असलेला निळवंडेचा हा विसर्ग शनिवारीदेखील कायम होता; परंतु त्यापुढे पाणी वळविण्याच्या उद्योगाने जायकवाडीत काही केल्या पाणी पोहोचत नसल्याचे दिसते. निळवंडेच्या पुढे ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. येथून कालव्याला पाणी सोडणे सुरूच आहे. कालवे काही केल्या बंद होत नसल्याने जायकवाडीला येणाºया पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाला आहे.
ओझर बंधाºयास छोटे-मोठे बंधारे आहेत. हे बंधारेही भरून घेण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती समजते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जायकवाडीत प्रत्यक्ष पोहोचलेले पाणी, वहन व्यय आदी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करण्याची सूचना कार्यकारी संचालकांनी केली होती. त्यानुसार ही माहिती सादर करण्यात आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. जायकवाडीला पोहोचलेल्या पाण्याचा हिशोब शासनास सादर झाला आहे. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी वरच्या भागात पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारवाई केली जात आहे; परंतु प्रत्यक्षात पाणी पळविण्यास जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. निळवंडेचे पाणी रविवारी पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भेरडापूरपर्यंत आले पाणी
जायकवाडीसाठी सोडलेले पाणी शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु प्रत्यक्षात येथे शुक्रवारी पाणी पोहोचलेच नाही. भेरडापूरपर्यंत शनिवारी पाणी पोहोचल्याची माहिती ‘कडा’तर्फे देण्यात आली. भेरडापूर येथून पुढे आणखी तीन बंधारे आहेत. त्यामुळे हे बंधारेही भरून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.