दुचाकीचे ‘हॅंडल लॉक’केल्यानंतरही चोरी कशी? सुरक्षिततेसाठी अधिकचे लॉक वापराच
By सुमित डोळे | Published: July 4, 2024 07:23 PM2024-07-04T19:23:42+5:302024-07-04T19:24:00+5:30
दुचाकी चोरीला गेल्यानंतर ग्रामीण भागात विकल्या जातात. गेल्या काही महिन्यांमध्ये दुचाकी सापडून न येण्याचे ते प्रमुख कारण आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन वर्षांपासून शहरात सुरू असलले वाहनचोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालये, शॉपिंग मॉल, भाजी मंडई, बार, बँक, एटीएम सेंटर, सरकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये चोरांचा वावर आढळून येतो. क्षणात हँडल लॉक तोडून चोर दुचाकी लंपास करतात. त्यात तुलनेत चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास पन्नास टक्केदेखील नाही. पोलिस दुचाकी चोरी थांबवण्यात अपयशी ठरत असताना, दुसरीकडे नागरिकदेखील लाखो रुपयांच्या दुचाकीच्या बाबतीत हलगर्जीपणा करत असल्याचे मत पोलिस व्यक्त करतात.
पाच महिन्यांत चोऱ्या वाढल्या
पाच महिन्यांमध्ये शहराच्या १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधून तब्बल ४३० च्या आसपास चारचाकी व दुचाकी चोरीला गेल्या. यात ९५ टक्के प्रमाण दुचाकींचेच आहे. बनावट चावीपेक्षा हँडल लॉक तोडून दुचाकी चोरण्यात चोर अधिक तरबेज झाले आहे.
तीन वर्षांपासून रेकॉर्ड ब्रेक
वर्षे - वाहनचोरी - शोध
२०२१ - ९२० - ३११
२०२२ -९२५ - २९३
२०२३ - ८९६ -२८५
कोणत्या महिन्यात किती?
महिना दुचाकी चोऱ्या
जानेवारी ८३
फेब्रुवारी ७५
मार्च ९६
एप्रिल ७०
मे १०६
चोरीच्या दुचाकींचे पुढे काय?
दुचाकी चोरीला गेल्यानंतर ग्रामीण भागात विकल्या जातात. गेल्या काही महिन्यांमध्ये दुचाकी सापडून न येण्याचे ते प्रमुख कारण आहे. नशा, मौजमजेसाठी दुचाकी चोरून दूरच्या जिल्ह्यांतही विकल्या जातात. बहुतांश नशेखोर झटपट पैशांसाठी गॅरेजचालकांना दुचाकीचे सुटे भाग विकतात.
सर्वाधिक चोऱ्या प्रोझोन मॉल, रुग्णालय
गेल्या पाच महिन्यांमध्ये प्रोझोन मॉल, एमजीएम रुग्णालय परिसर, घाटी रुग्णालयाच्या आवारातून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या. त्याखालोखाल शहानूरमियाँ दर्गा, सिग्मा रुग्णालयाचा परिसर, शहानूरमियाँ दर्गा चौकातील रविवारचा बाजार, चिकलठाणा बाजार, वाळूज औद्योगिक वसाहत, टी. व्ही. सेंडर, सिडको, हडको परिसरांतून चोरीला जात आहेत.
अधिकचे लॉक वापराच
दुचाकी जुनी झाल्यानंतर तिचे हँडल लॉकदेखील खराब होते. परिणामी ते सहज तुटते किंवा दुसऱ्या चावीने दुचाकी सुरू होऊ शकते. त्यामुळे ठरावीक काळानंतर दुचाकीचे लॉक बदलून मूळ कंपनीचे लॉक लावावे. शिवाय, बाजारपेठेत, शॉपिंग वेबसाइटवरदेखील २०० ते ८०० रुपयांपर्यंत दुचाकीसाठी विविध लॉक उपलब्ध आहेत.