‘मेगा’ दुरुस्तीनंतरही विजेचा लपंडाव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:26 PM2019-07-19T17:26:49+5:302019-07-19T17:29:42+5:30
दहा तास अंधारात राहण्याची भीमनगर-भावसिंगपुऱ्यातील नागरिकांना शिक्षा
औरंगाबाद : छावणी उपविभागांतर्गत भीमनगर-भावसिंगपुरा या नागरी वसाहतीला विद्युत पुरवठा करणारी वाहिनी जळाल्यामुळे त्या परिसरातील वीजपुरवठा तब्बल दहा तास बंद होता. याशिवाय सिल्कमिल कॉलनी परिसरातील केबल जळाल्यामुळे बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे त्या भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली.
छावणी उपविभागाच्या अंतर्गत भीमनगर- भावसिंगपुरा या परिसराला विद्युत पुरवठा करणारी केबल जळाल्यामुळे बुधवारी सकाळी ६ वाजेपासून वीजपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती छावणी उपविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर जळालेल्या केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास सात- आठ तासांचा कालावधी लागल्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. जळालेल्या केबलच्या जागी नवीन केबल टाकण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिल्कमिल कॉलनी परिसरातील केबल जळाल्यामुळे या भागात अंधार पसरला. रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत झाला नाही. वीजपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी उकाडा व मच्छरांचा त्रास सहन करावा लागला. गुरुवारी दुपारपर्यंत या भागातील वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते; मात्र रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.
केबल उपलब्ध नसल्यामुळे झाला उशीर
छावणी उपविभागाचे अतिरिक्त अभियंता चिंचाणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भीमनगर येथील केबल जळाली होती. त्यानंतर सिल्कमिल कॉलनी येथीलही केबलच जळाली. केबल उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबत वरिष्ठ कार्यालयांकडे मागणी करण्यात आली. कंडक्टर तुटले तर ते लगेच दुरुस्त केले जाते; पण केबल जळाल्यास ती तात्काळ बदलता येत नाही. केबल उपलब्ध झाल्यानंतर युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली. संपूर्ण केबल बदलावी लागत असल्यामुळे उशीर होणे अपरिहार्य आहे.