पावसाळा संपला तरीही अतिक्रमणे जशास तशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:31 AM2017-10-02T00:31:55+5:302017-10-02T00:31:55+5:30
पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत, असे एका शासकीय परिपत्रकाचा आधार घेत महापालिका मागील चार महिन्यांपासून जबाबदारी झटकून टाकते. आता पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर सायंकाळी औरंगाबादकरांना दुचाकी नेणे कठीण झाले आहे. जुन्या शहरात अधिक यातना सहन कराव्या लागत आहेत.
महापालिका प्रशासनाचे शहरात अजिबात ‘भय’उरलेले नाही. ज्याच्या मनात येईल तो तिथे अतिक्रमण करून मोकळा होतो. रस्त्यावर, नाल्यात अतिक्रमण का केले असा जाबही पालिकेच्या प्रशासकीय विभागातर्फे विचारण्यात येत नाही. उलट या अतिक्रमणाला ‘कायदेशीर’संरक्षण कसे मिळवून देता येईल, यादृष्टीने अधिकारी व कर्मचारी ‘काम’करतात. अतिक्रमण हटाव विभागाकडे ३६५ दिवसांमध्ये तब्बल १२०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील १०० तक्रारींचेदेखील निरसन होत नाही. आकड्यांकडे लक्ष घातले असता महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नेमका करतो तरी काय हा प्रश्न निर्माण होतो.
गतमहिन्यात शहरातील विविध भागांत नाल्यांमधील अतिक्रमणांचे काय परिणाम होत आहेत याची प्रचीती औरंगाबादकरांना आली. नाल्यातील अतिक्रमणे काढा, यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांनीही तीन दिवसांमध्ये अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले. आता ३० दिवस होत आले तरी अतिक्रमणे जशास तशी आहेत.