दीड तपानंतरही एपीआय कामगारांचा ऋणानुबंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:02 AM2021-08-01T04:02:12+5:302021-08-01T04:02:12+5:30

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ ...

Even after one and a half heat, the bond of API workers remains | दीड तपानंतरही एपीआय कामगारांचा ऋणानुबंध कायम

दीड तपानंतरही एपीआय कामगारांचा ऋणानुबंध कायम

googlenewsNext

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ वर्षांनंतर शुक्रवारी ३० जुलै भेटले, तो क्षण भावूक होता. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.

या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले ते ‘लोकमत’चे उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) बालाजी मुळे, तसेच कामगार नेते एस.एम. कुलकर्णी, युवराज पाटील, विजय इंगळे हे मान्यवर. यावेळी युवराज पाटील, आर.बी. पाटील, मोहन गोरमे यांनी मनोगत व्यक्त केले. चिकलठाणा एमआयडीसीत १९७२ नंतर एपीआय कंपनी आली आणि खऱ्या अर्थाने शहरातील औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली; मात्र टप्प्याटप्प्याने २००३ पर्यंत ही कंपनी बंद पडली आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. १७ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमिलनात उपस्थित सर्वांना सुरुवातीचे दिवस आठवले. कंपनीच्या प्रगतीसाठी अहोरात्र घेतलेले परिश्रम, कामगारांच्या प्रश्नांसाठी उठविलेला आवाज, रेल्वे रुंदीकरण, वैधानिक विकास महामंडळ तसेच हायकोर्टची निर्मिती, सिडकोच्या विकासाचे प्रश्न किंवा त्या काळी गाजलेला मुंबई गिरणी कामगारांचा प्रश्न, या चळवळीत एपीआयचे कामगार हिरीरीने सहभागी व्हायचे.

चौकट

यांनी घडवून आणली कामगारांची भेट

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात प्रभाकर खराडकर, महाजन चुंगडे, उत्तम वडगावकर, आर.आय.शेख, किसन रणसुभे, दिलीप मोगले, अनंता जोशी, सारंगधर जोशी, यादवराव बोरसे, नारायण ढाकणे यांचा सहभाग होता.

चौकट

पीएफची रक्कम दिली मिळवून

‘लोकमत’चे मनुष्य बळ विकास विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे यांनी सांगितले की, मी एपीआय कंपनीत १० वर्षे अधिकारी म्हणून काम केले. तेव्हा कामगारांच्या अडचणी जवळून पाहण्यास मिळाल्या. कंपनी बंद पडली तेव्हा ‘लोकमत’च्या माध्यमातून कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांच्या मुलांना विविध कंपनीत नोकरी लावून दिली. पीएफच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एपीआयच्या मालकांना कामगारांचा थकीत पीएफ जमा करण्यास सांगितले.

--

खेळातही होता दबदबा

एपीआयमधील तत्कालीन सहायक अधिकारी एस.एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, या कंपनीतील असोसिएशन ऑफ इंजिनिअरींग वर्कर्स या संघटनेने नुसते कामगारांचेच प्रश्न सोडविले नाहीत, तर कब्बडी,व्हॉलीबॉल आदी मैदानी खेळातही आपला दबदबा निर्माण केला होता. लेझीममध्ये तर कंपनीचे पथक एशियाड स्पर्धेत सहभागी झाले होते.

--

Web Title: Even after one and a half heat, the bond of API workers remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.