पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही रोहयो कामे थंडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:29 AM2018-12-19T00:29:06+5:302018-12-19T00:30:49+5:30
अधिकाऱ्यांच्या ‘जोर बैठका’ निष्फळ : १३५ पैकी ६१ ग्रामपंचायतीअंतर्गत किरकोळ कामे सुरु
मोबीन खान
वैजापूर : आठ दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी तालुक्यात येऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या उपस्थितीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘जोर बैठका’ झाल्या. परंतु, या सर्व आटापिट्यानंतरही रोहयो विभागाच्या कार्यपध्दतीतील गतीमानतेचा ‘दुष्काळ’ काही हटल्याचे दिसत नाही. तालुक्यातील १३५ पैकी आजघडीला केवळ ६१ ग्रामपंचायतीअंतर्गत रोहयोची कामे सुरु आहेत, तीही बोटावर मोजण्याइतपत. एकेका ग्रामपंचायतीअंतर्गत केवळ एक ते दोन कामे सुरु असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
सध्या तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चाºयासह पाणीटचाईचे संकट दिवसागणिक गडद होत आहे. पावसाअभावी रबी पेरणी झालेली नाही. त्यामुळे शेतामध्ये कामे नाहीत. परिणामी शेतकºयासह शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. उपरोक्त विदारक स्थिती समोर आल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथील टंचाई आढावा बैठकीत रोजगार हमी योजनेच्या कामांना गती देण्याबाबत आदेशित केले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीईओंनी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासोबत येथे बैठक घेतली होती.
यावेळी त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांना अधिकाधिक प्रमाणात मंजुºया देऊन ती सुरु करण्याबाबत आदेशित केले होते. जे अधिकारी रोहयोच्या कामांमध्ये कुचराई करतील, त्यांच्याविरूध्द कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा वजा दमही भरला होता. सदरील जोरबैठकानंतर विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, सदरील जोरबैठकाही विशेषत: रोहयोच्या अधिकाºयांनी फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचे प्रगतीपथावरील कामांच्या अहवालावर नजर टाकल्यानंतर समोर येते.
७५ गावांतील मजुरांनी धरला शहराचा रस्ता
तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या १३५ एवढी आहे. परंतु, आजघडीला यापैकी केवळ ६१ ग्रामपंचायतीअंतर्गतच रोजगार हमी योजनेची कामे सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुरु असलेली एकूण कामे अणि संबंधित ग्रामपंचायतीच्या संख्येचा विचार केला असता, एकेका ग्रामपंचायतीअंतर्गत केवळ एक ते दोन कामे सुरु आहेत. उर्वरित ७५ ग्रामपंचायतीअंतर्गत एकही काम सुरु नाही. त्यामुळे अशा गावातील मजूर आता कामाच्या शोधात शहराचे रस्ते धरु लागले आहेत. अशा स्वरूपाचे स्थलांतरण थांबविण्याची मागणीही आता संस्था, संघटनांकडून प्रशासनाकडे होऊ लागली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीने या अनुषंगानेच नुकतेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यानंतरही प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या कामांना गती न दिल्यास भविष्यात अशा निवेदनांचा ओघ वाढू शकतो. उपरोक्त प्रश्न लक्षात घेता, संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी काटेकोर नियोजन करून रोहयोला गती द्यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
१ लाख ४४ हजार जॉबकार्डधारक
वैजापूर तालुक्यात नोंदणीकृत मजुरांची संख्या १ लाख ४४ हजार ९४३ आहे. यापैकी आजघडीला केवळ ९९८ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना कामांची अणि मजुरांची संख्या वाढणार तरी कधी, असा सवाल आता खुद मजूरच उपस्थित करू लागले आहे.
रोजगार हमी...अर्ध्यात तुम्ही...अर्ध्यात आम्ही
तालुक्यात रोजगार हमी योजेनेअंतर्गत ६१ ठिकाणी कामे सुरु असल्याचे अहवाल आहे. मात्र, त्यापैकी पन्नास टक्के काम केवळ कागदोपत्री दाखवून संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन ‘अर्ध्यात तुम्ही...अर्ध्यात आम्ही’ अशा पद्धतीने सुरु आहेत. बोगस कामावर बनावट रोजगार दाखवून निधी उचलला जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.