वाटणीनंतरही, पालक मालमत्ता परत घेऊ शकतील ताब्यात; ज्येष्ठांसाठी विभागीय आयुक्तांचे पाऊल
By विकास राऊत | Published: February 16, 2024 01:06 PM2024-02-16T13:06:05+5:302024-02-16T13:07:44+5:30
तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू होणार
छत्रपती संभाजीनगर : आयुष्यभर राबराब राबून पाल्यांना सुरक्षित आयुष्य देण्यासह मालमत्तेची वाटणी करून दिल्यानंतर तेच पाल्य मागे वळून आपल्या पालकांना पाहत नाहीत. मालमत्तेची वाटणी करून दिल्यानंतर त्यांचे जगणे कसे आहे, याकडे दुर्लक्ष करतात. अशा काही तक्रारी आल्यामुळे न्यायालयीन आदेशाचा आधार घेत ज्येष्ठांसाठी तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
शासनाच्या ९ जुलै २०१८च्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. तसेच केंद्र शासनाने आणलेला २००७ हा कायदा आई-वडील ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह कल्याणासाठी आहे. याचा आधार घेत आयुक्त राजेअर्दड यांनी परिपत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, मराठवाड्यातील सर्व तलाठी सजाअंतर्गत ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या आई - वडील, ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी, तहसील, मंडळ अधिकारी, तलाठी सजांमार्फत आवश्यक पावले उचलली जावीत.
कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तांचे सरंक्षण करण्याबाबत कृती आराखडा दिलेला आहे. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची तलाठ्यांनी महिन्यांतून एकदा भेट घ्यावी. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती करून वेळोवळी आढावा घ्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरी समन्वय संनियंत्रण समितीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त अनंत गव्हाणे, जगदीश मिनीयार, मातोश्री वृध्दाश्रमच्या संचालिका पद्मा तापडिया यांची उपस्थिती होती.
मालमत्तेच्या वाटणीपूर्वी हे पाहावे लागणार
महसुली अभिलेखात फेर होत असताना किंवा वाटणीच्या आधारे फेर करीत असताना आई - वडील, ज्येष्ठांच्या उदरनिर्वाहासाठी मालमत्ता ठेवली आहे की नाही, पालकांच्या पुढील आयुष्यात काळजीसंदर्भाने अटी व शर्ती नमूद केल्या आहेत का, याची शहानिशा करून मालमत्तेचा फेर घेण्यात यावा. महसूल अभिलेखात फेर घेऊन मालमत्तेची वाटणी झाल्यानंतर तलाठ्यांनी सजानिहाय खातरजमा करावी. मुले सांभाळत नसल्याची ज्येष्ठांनी तलाठ्यांकडे तोंडी तक्रार केली तरी त्याला लेखी स्वरूप देऊन तलाठ्यांनी वरिष्ठांकडे सादर करावी.