चिमूकलेही वासनेचे बळी, पीडितांमध्ये ११ टक्के अल्पवयीन मुली; परिचितांकडूनच सर्वाधिक घात
By संतोष हिरेमठ | Published: January 5, 2024 04:14 PM2024-01-05T16:14:38+5:302024-01-05T16:15:23+5:30
पालकांनो काळजी घ्या, मुलांना ‘बॅड टच, गुड टच’ शिकवा
छत्रपती संभाजीनगर : महिलांबरोबर लहानगेही वासनेचे बळी ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या पीडितांमध्ये तब्बल ११ टक्के अल्पवयीन मुली आहेत. अगदी ११ वर्षाच्या मुलीवरही अत्याचाराची घटना घडली. यात ओळखीच्या लोकांकडूनच सर्वाधिक घात झाला आहे. घाटीत लैंगिक अत्याचारग्रस्तांवर वैद्यकीय तपासणी, उपचारासह मानसिक आधारही देण्यात येत आहे.
ओळखीच्याच लोकांकडून शारीरिक, लैंगिक अत्याचाराला महिला सर्वाधिक बळी पडतात. अत्याचारानंतरही अनेक कारणांनी 'तिच्या' वेदना वाढतात. हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाकडून ‘सुकून’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यासह 'आय ॲम नॉट व्हिक्टीम' असा विश्वास देऊन पीडितांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटनेविषयी, आरोपी ओळखीचा आहे की, अनोळखी आदी माहिती घेतली जाते. त्यातूनच पोलिसांच्या तपासाला दिशाही मिळते आणि आरोपीला शिक्षा होण्यासही मदत होते.
घाटीत वर्षभरात किती अत्याचारग्रस्तांवर उपचार?
घाटीत २०२३ या वर्षात तब्बल ७२४ अत्याचारग्रस्त महिलांवर उपचार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि लगतच्या भागातून पीडिता उपचारासाठी घाटीत दाखल होतात.
किती अल्पवयीन मुलींवर अत्याचार?
गेल्या वर्षभरात घाटीत दाखल झालेल्या ७२४ पीडितांमध्ये तब्बल ८० अत्याचारग्रस्त या अल्पवयीन असल्याचे आकडेवारीवरून समोर आले. यात ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायदा करण्यात आला. या सर्व अल्पवयीन पीडितांवरील अत्याचारप्रकरणी याच कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालकांनी घ्यावी काळजी
मुलांच्या सुरक्षेसाठी पालक नेहमीच दक्ष असतात. मुलांच्या संपर्कात कोणकोण असतात, याची पालकांनी माहिती घ्यावी. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्यासह त्यांना ‘गुड टच बॅड टच’ची माहिती देणेही गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
सुकून कक्षात तपासणी
पीडितांची विभागातील सुकून कक्षातच तपासणी केली जाते. पीडितांच्या तपासणीला प्राधान्यक्रम दिला जातो. पीडितांची वेळीच वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. यातून पुरावे मिळून आरोपीला शिक्षा मिळण्यास मदत होते.
- श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, घाटी