पाण्यासाठी चिमुकल्यांचीही भटकंती; जलवाहिनीच नसल्याने शंभूनगर वासीयांवर भीषण संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 05:28 PM2019-05-09T17:28:15+5:302019-05-09T17:31:42+5:30
गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे
औरंगाबाद : शंभूनगर, गारखेडा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंती करावी लागत आहे. पहाटे गादिया विहार परिसरातून पाणी वाहून आणावे लागते.
विभागीय क्रीडा संकुलास लागून शंभूनगर ही वसाहत आहे. ही वसाहत बाराही महिने हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु उन्हाळ्यात बोअरही आटल्याने भीषण पाणी संकट ओढावले आहे. मात्र याकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातून मोठ्या व्यासाची जलवाहिनी गेली आहे. त्यातून नागरिकांना एक थेंबही पाणी देण्याचा अधिकार नसल्याचे अधिकारी सांगतात. गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करतात.
टँकरशिवाय आम्हाला गत्यंतर नसल्याचे शांतीलाल गायकवाड यांनी सांगितले. गुंठेवारी भागात पाणी देता येत नाही, असे सतत सांगून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आमची बोळवण करीत आहेत, असा आरोप प्रेमानंद वाघ यांनी केला. ‘कर घ्या पाणी द्या’, असे मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना बोलूनही पाणी प्रश्नाकडे सतत कानाडोळा केला जात आहे, असे उमर अहेमद म्हणाले. परिसरातील बोअरवेलने तळ गाठल्याने टँकर किंवा इतर वसाहतीत जाऊन पाणी आणावे लागते, असे रोहित प्रजापती, लड्डू दाभाडे म्हणाले. वयोवृद्धांसह मुलांना सकाळीच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे घरातील कामे रखडतात, असे डॉ. रमेश शिंदे , जानेखा उस्मानखा पठाण, जावेद अहेमद यांनी सांगितले.
शंभूनगरच्या लगत असलेल्या इमारत व कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जातो. परंतु कर भरूनही येथील नागरिकांना मनपा मोफत टँकर पाठवीत नसल्याचे भीमराव साळवे, शेख छोटूमिया शेख कादर यांनी सांगितले. स्वखर्चाने लोकप्रतिनिधीने जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. परंतु त्याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने खाजगी टँकरवरील पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे, असे यांनी सांगितले.
नगरसेविका स्मिता घोगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, पाण्याची अवस्था गंभीर असून, जनतेला पाणी मिळावे म्हणून साडेअकरा लाखांची जलवाहिनीची फाईल आयुक्तांच्या टेबलवर पडून आहे. त्यावर सहीच झाली नाही. जनतेची पाण्यासाठीची भटकंती थांबविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महापौर व आयुक्तांनी वॉर्डात येऊन जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत, अशी विनंतीदेखील मी केली आहे.