डॉक्टरांचीही आता पळवापळवी; नवी रुग्णालये देताहेत गलेलठ्ठ पगाराची ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 02:01 PM2020-12-12T14:01:10+5:302020-12-12T14:03:12+5:30
अधिक वेतन मिळत असल्याने छोटी रुग्णालये बंद करून मोठ्या रुग्णालयांत रुजू होण्याकडे डॉक्टरांचा कल वाढत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद हे आता मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. मल्टिस्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिटी आणि कॉर्पोरेट रुग्णालयांचे जाळे औरंगाबादेत वाढत आहे. शहरात नवीन रुग्णालय सुरू करताना डॉक्टरांना गलेलठ्ठ पगाराची ऑफर, पॅकेज देऊन नियुक्ती दिली जात आहे. अधिक वेतन मिळत असल्याने छोटी रुग्णालये बंद करून मोठ्या रुग्णालयांत रुजू होण्याकडे डॉक्टरांचा कल वाढत आहे. शहरातील वैद्यकीय सेवेचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला असून, खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ वर गेली आहे. गेल्या ५ वर्षांत ७७ वर नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या उपचारपद्धतीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज राहिलेली नाही. शहरातील जालना रोडलगत गेल्या काही वर्षांत खाजगी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. चिकलठाणा ते भगवान महावीर चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खाजगी रुग्णालये उभी राहिली आहेत. जालना रोडपाठोपाठ बीड बायपासवरदेखील ठिकठिकाणी नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या शाखाही औरंगाबादेत सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रसूतिशास्त्र, अस्थिव्यंगोपचारासह हृदयविकार,मूत्रपिंडविकार, मेंदूविकार, पोटाचे विकार यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत. नव्याने रुग्णालय सुरू करताना शहरात कार्यरत डॉक्टरांना लाखो रुपयांच्या वेतनाचे पॅकेज दिले जात आहे.
वेतन, वीजबिलासह अनेक खर्च
रुग्णालयातील मनुष्यबळाचे वेतन, वीजबिल, जागेचे भाडे, नियमांच्या पूर्ततेसाठी खर्च अशा विविध गोष्टींसाठी रुग्णालयांना खर्च येतो. हा खर्च गेल्यानंतर उत्पन्न मिळते. हे सर्व करून छोटी रुग्णालये चालविण्याऐवजी मोठ्या रुग्णालयांत रुजू होण्याकडेही डॉक्टर वळत आहेत.
नव्या रुग्णालयांमुळे रुग्णसेवेत वाढ
शहरात मोठी रुग्णालये येणे, ही चांगली बाब आहे. त्यातून रुग्णसेवेत वाढ होते. मोठ्या रुग्णालयांमुळे नागरिकांना उपचारासाठी मुंबई, पुण्याला जावे लागत नाही. सुपरस्पेशालिटी डॉक्टर हे मोठ्या रुग्णालयात असतात. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुजू होणे ही सामान्य बाब आहे.
- डॉ. शोएब हाश्मी, सचिव, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन