डेडलाईन संपली तरीही रस्त्यांवर खड्डे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:14 AM2017-12-16T01:14:18+5:302017-12-16T01:14:28+5:30
राज्यातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची डेडलाईन आज (दि. १५) संपली असली तरी पैठण तालुक्यातील अनेक रस्त्यावर मोठे खड्डे अजूनही तग धरून आहेत. मुख्य रस्त्यावरील जवळपास ७० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून उर्वरित खड्डे ३१ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : राज्यातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची डेडलाईन आज (दि. १५) संपली असली तरी पैठण तालुक्यातील अनेक रस्त्यावर मोठे खड्डे अजूनही तग धरून आहेत. मुख्य रस्त्यावरील जवळपास ७० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून उर्वरित खड्डे ३१ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. दरम्यान, तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या पैठण -औरंगाबाद रस्त्यावरील खड्डे बºयापैकी बुजविण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सा.बां.मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली खड्डे बुजविण्याची डेडलाईन १५ डिसेंबर रोजी संपली असून या घोषणेनुसार पैठण तालुक्यातील ३ स्टेट हायवे व ९ एमडीआर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामे प्रगतीपथावर आहेत. स्टेट हायवेवरील ७० टक्के तर एमडीआर (प्रमुख जिल्हा मार्ग) रस्त्यावरील ४० टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याचा दावा पैठणचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांनी केला आहे.खड्डे बुजविण्यासाठी पैठण सार्वजनिक बांधकाम विभागास तीन कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. पैठण-शहागड रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
राज्य रस्ताअंतर्गत पैठण -औरंगाबाद, पैठण -पाचोड व पैठण -शहागड या रस्त्यावरील ७० टक्के खड्डे बुजविण्यात आले असून पुढील कामही प्रगतीपथावर आहे. तसेच गाव व तांडे जोडणारे ९ एमडीआर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम ४० टक्के झाले आहे. या दोन्ही प्रकारच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम ३१ डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील, अशी हमी बोरकर यांनी दिली.