पुन्हा मंत्रिपद मिळाले नाही तरी खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व निर्णयांचे समर्थन: संदीपान भुमरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:00 PM2022-07-05T19:00:59+5:302022-07-05T19:14:34+5:30
आमच्यात मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल.
औरंगाबाद: मंत्रीमंडळावर अद्याप चर्चा झालेली नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांमध्ये मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल. मी मंत्री होतो तेव्हा शिरसाट माझ्यासोबत होते, ते मंत्री झाले तर मी सोबत असेल, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. बंडखोरीनंतर भुमरे आज सायंकाळी औरंगाबादला परतले.
२० जून ला विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंड करून वेगळी चूल मांडली. शिंदे यांच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे सहभागी झाले होते. गुवाहाटी, गोवा ते मुंबई असा प्रवास करून शिंदे यांनी भाजपाच्या सहाय्याने नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात परतत आहेत. आज सायंकाळी पैठणचे आमदार संदीपान भुमरे औरंगाबादला आले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाने आम्हाला मोठे केले, हे खरे. मात्र, मी देखील थेट आमदार झालो नाही. पक्ष वाढीसाठी मी ३५ वर्ष दिले आहेत. लाठ्याकाठ्या अंगावर झेलल्या. अनेक केसेस झाल्या. तरीही डगमगलो नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मला सर्वकाही मिळाले. माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मंत्री झाला, असेही भुमरे यावेळी म्हणाले.
आमच्यात मंत्रीपदावरून कोणताही वाद नाही
आम्ही बाहेर पडलो तेव्हा आमच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. पण आम्ही शांत राहिलो. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्यात मंत्रीपदावरून वाद होत असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तसे काहीही नाही. मी मागच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होतो. तेव्हा आमदार संजय शिरसाट माझ्या सोबत होते. आता ते मंत्री झाले तर मी त्यांच्यासोबत असेल. मंत्रिपद मिळाले नाही तरी मला खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदे जे निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी स्पष्टोक्ती भुमरे यांनी दिली.
धमक्यांना घाबरत नाही
मी देखील बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जे कोणी मला धमकी देत आहेत, त्यांनी माझ्याकडे येऊन दाखवावे. आज मी शहरात आलोय. उद्या शहरात असेल. आम्हाला कोणी धमक्या देऊ नये. मी धमक्यांना घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.