सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By विकास राऊत | Published: March 14, 2023 01:09 PM2023-03-14T13:09:17+5:302023-03-14T13:14:18+5:30

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याच्या घोषणेला झाले ९ महिने

Even if the government changes, the graph of farmer suicides rises in Marathwada | सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

googlenewsNext

- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर :
राज्यात सरकार बदलून ९ महिने झाले आहेत. तरीही शेतकरी आत्महत्यांचा आलेख काही खाली आलेला नाही. नवीन वर्षातील ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५२ आत्महत्या झाल्या असून, सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते.

नवीन सरकार सत्तेवर येताच राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारमधील मंत्रीच शेतकरी आत्महत्या ही नित्याची बाब झाल्याचे वक्तव्य करून जखमेवर मीठ चोळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. विरोधकांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

सावकारी कर्जाचा पाश, नापिकी, अतिवृष्टीची कारणे
सावकारी कर्जाचे व्याज जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची परतफेड करणे शक्य होत नाही, अशी तक्रार मध्यंतरी विभागीय आयुक्तालयाकडे आली होती. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरावे लागतात.

चार वर्षांपासून अतिवृष्टी
मराठवाड्यात मागील चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
बीड जिल्ह्यात गेल्या ७२ दिवसांत ५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

बँकांनी कर्ज दिले नाही म्हणून सावकारी कर्जाचा पाश
४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाहीये. हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात आहे.
- राजन क्षीरसागर, सचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा

नवीन वर्षांतील ७२ दिवसांत १६४ आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : १६
जालना : ११
परभणी : १४
हिंगोली : ३
नांदेड : २५
बीड : ५२
लातूर : १०
धाराशिव : ३२
एकूण : १६३

Web Title: Even if the government changes, the graph of farmer suicides rises in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.